अकोला : यंदा कापूस उत्पादनात झालेली घट, बाजारातील अपेक्षेपेक्षा कमी आवक तसेच जागतिक व देशांतर्गत पातळीवरील घडामोडींचा परिणाम म्हणून अकोला जिल्ह्यात कापसाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. कापसाचे दर प्रतिक्विंटल ८ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, हे दर गत काही वर्षांतील उच्चांकी मानले जात आहेत. दरम्यान, कापसाचे दर लवकरच प्रतिक्विंटल ९ हजार रुपयांचा टप्पा गाठणार असल्याचे कापूस विपणन तज्ज्ञांचे मत आहे.
मध्यम धाग्याच्या कापसाचे दर थेट ८ हजार ४०० ते ८,५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. विशेष म्हणजे, शासनाच्या हमीभावालाही मागे टाकले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कापूस लागवडीत घट, सरकारने आयातीवरील शुल्कात वाढ केली आहे.
राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाची आवक स्थिर असली तरी दरांमध्ये मात्र लक्षणीय सुधारणा पाहायला मिळत आहे. काल, १८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या लिलावामध्ये विदर्भातील विविध बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दराने ८ हजारांचा टप्पा ओलांडला असून, वरोरा बाजार समितीने उच्चांकी दराची नोंद केली आहे.
बाजार समित्यांमधील चित्र
- वरोरा बाजार समिती: येथे ‘लोकल’ वाणाच्या कापसाची मोठी आवक झाली. १०८७ क्विंटल कापसाची आवक झाली असून, जास्तीत जास्त दर ८,१५१ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला. येथील सर्वसाधारण दर ७,९३० रुपये इतका राहिला.
- काटोल: काटोलमध्ये लोकल वाणाच्या कापसाला ८,१०० रुपये असा उच्चांकी दर मिळाला. येथे ९२ क्विंटल कापसाची आवक झाली असून सर्वसाधारण दर ७,९०० रुपये राहिला.
- भिवापूर: या बाजार समितीत ‘लांब स्टेपल’ (Long Staple) कापसाची ८३० क्विंटल आवक झाली. दर्जेदार प्रतीमुळे येथे किमान दर ८,०५० रुपये तर कमाल ८,२१० रुपये इतका मिळाला.
- वरोरा-शेगाव: मध्यम स्टेपल कापसासाठी येथील बाजार समितीत ८,०५० रुपये इतका जास्तीत जास्त दर मिळाला.
वाचा : म्हाडाची मोठी भेट: मध्यमवर्गीयांसाठी १३०० घरांची लॉटरी!







