नवी मुंबई: सिडकोने नवी मुंबईत ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेअंतर्गत नवीन माहितीपुस्तिका प्रसिद्ध केली असून, घरांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेत प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी घरांची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
घरांची माहिती आणि ठिकाणे
या योजनेत एकूण ९,२४९ नवीन घरांचा समावेश करण्यात आला आहे. ही घरे प्रामुख्याने खालील भागात उपलब्ध आहेत:
- खारघर (तळोजा सेक्टर २८, ३७, ३९): येथे मोठ्या प्रमाणात EWS आणि LIG घरे आहेत. सेक्टर ३९ मध्ये सर्वाधिक ४,५९९ घरे उपलब्ध आहेत.
- खारकोपर (उलवे): येथे पहिल्यांदाच 2BHK घरांचा समावेश करण्यात आला आहे (५४० चौ. फूट कार्पेट एरिया). खारकोपरमध्ये एकूण १,४२५ नवीन 2BHK घरे उपलब्ध आहेत.
- इतर ठिकाणे: बामणडोंगरी, कळंबोली बस डेपो, मानसरवर आणि खानदेश्वर रेल्वे स्टेशन परिसर, वाशी ट्रक टर्मिनल.
घरांच्या किमती आणि कार्पेट एरिया किती?
- EWS गट: कार्पेट एरिया साधारण ३२२ चौ. फूट असून किमती २२.७० लाख ते ४३.५० लाख रुपयांपर्यंत आहेत.
- LIG गट: कार्पेट एरिया ३२२ ते ५४० चौ. फूट (2BHK) दरम्यान आहे. वाशी टर्मिनल येथील घरांची किंमत सर्वाधिक म्हणजे सुमारे ६६.७० लाख रुपये आहे.
पात्रता निकष (Eligibility Criteria)
वय : अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
उत्पन्न मर्यादा: EWS अर्जदारांनसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असावे. LIG गटात बसणाऱ्या अर्जदारांनसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा जास्त.
अधिवास: अर्जदाराकडे महाराष्ट्राचे १५ वर्षांचे वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे बंधनकारक आहे.
घराची अट: EWS अर्जदाराचे किंवा कुटुंबाचे भारतात कुठेही पक्के घर नसावे. LIG अर्जदाराचे नवी मुंबई परिसरात घर नसावे.
महत्त्वाच्या अटी आणि शर्ती
आरक्षण: अनुसूचित जाती (११%), अनुसूचित जमाती (६%), शारीरिक विकलांग (५%) आणि इतर प्रवर्गांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे.
विक्रीवर बंदी: EWS गटातील घरे ५ वर्षांपर्यंत, तर LIG गटातील घरे ३ वर्षांपर्यंत विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाहीत.
PMAY लाभ: EWS गटातील लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून एकूण २.५० लाख रुपयांचे अनुदान मिळू शकते, जर त्यांनी यापूर्वी असा लाभ घेतला नसेल.
अर्जाची प्रक्रिया
इच्छुक अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यासाठी सिडकोच्या अधिकृत वेबसाईट http://cidcohomes.com/ वर जाऊन नोंदणी आणि KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
ही योजना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्याने (उदा. खानदेश्वर पासुन १५ मिनिटे, बामणडोंगरी पासून १५ मिनिटे अंतरावर) ग्राहकांसाठी ही मोठी गुंतवणूक आणि राहंण्यासाठी उत्तम संधी मानली जात आहे.
वाचा : खुशखबर: म्हाडाच्या कोकण मंडळाची नवीन लॉटरी फेब्रुवारीमध्ये! २००० हून अधिक घरांचा समावे







