अकोला : गेल्या चार वर्षांपासून कापसावर पडणाऱ्या बोंडआळीचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी, शेतकऱ्यांच कांदा पिकाकडे वाढलेला कल यामुळे दिवसेंदिवस कापसाचा पेरा कमी होत असल्याने आवक कमी होत आहे. त्यामुळे यावर्षी कापसाला उच्चांकी दर मिळत असून सुरुवातीलाच हमीभावाचा टप्पाही पांढऱ्या सोन्याचे दर वाढले आहेत. यंदा प्रथमच कापसाला प्रति क्विंटल आठ हजारावर भाव मिळत आहे.
कापसाला मागील काही वर्षात ४,५०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव मिळत होता. त्यामुळेच सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल अधिक राहात होता, कारण केंद्र सरकारने कापसाला ६ हजार ५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु यंदा केंद्राच्या या हमीभावापेक्षा बाजारात ८ हजार रुपये प्रतिक्विंटलने कापसाची खरेदी खासगी व्यापाऱ्यांकडून होत आहे.
कापूस वेचणीचा खर्चही वाढला असून लागवड खर्चातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाही कापसाचा उत्पादन खर्चही भरून निघेल की नाही, या विवंचनेत शेतकरी सापडला होता. अशातच दिवाळी तोंडावर असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. यादरम्यान जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जिनिंगकडून खरेदी सुरू करणे सुरू झाले असून लांब धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल ८,००० रुपयांच्यावर भाव मिळत आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
दिवसेंदिवस निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. यावर्षी वाढत्या महागाईमुळे तर शेतकऱ्यांच्या कंबरडेच मोडले असून उत्पादनातही मोठी घट झाली आहे. सुरुवातीस कापसावर बोंडअळीचा झालेला प्रादुर्भाव व अतिपावसामुळे कपाशीची बोंडे काळी पडून नुकसान झाले आहे. यंदा कापसाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून उत्पन्न मात्र अर्ध्यावर आहे. परंतु यंदा कापसाला मिळत असलेला भाव पाहता झालेल्या नुकसानीपासून काहीसा दिलासा नक्कीच शेतकऱ्यांना मिळत आहे. दिवाळीचा सण तोंडावर असून कापसाच्या वाढलेल्या भावामुळे दिवाळी काही प्रमाणात गोड होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे . शिवाय बोंडअळीमुळे शेतकरी वर्ग कापूस लागवडीपासून दुरावला आहे. सध्याच्या परिस्थितीत एकाच वेचणीत कापसाचे बोंडही संपणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना १०-१२ क्विंटल कापूस होण्याची अपेक्षा होती. तिथे केवळ ४-५ क्विंटल कापूस घरी येत असून उत्पन्नच निम्म्यावर आले आहे. एकंदरीतच उत्पन्न कमी असल्यामुळेच कापसाची दरवाढ झालेली आहे







