मुंबई : पेट्रोल, डिझेलची दरवाढ आधीच वाहनधारकांना डोक्याला ताप देणारी ठरत आहे. त्यातच वाहनाच्या सुट्या भागाचे (स्पेअर पार्ट) दर तब्बल 40 टक्क्यांनी वाढले. त्यामुळे आता वाहन चालविण्याबरोबरच देखभाल व दुरूस्तीचा खर्च नागरिकांना डोईजड ठरणार आहे.
इंधन दरवाढीचा फटका प्रमाणावर बसला असून, वाहनांच्या सुट्या भागांचा उत्पादन खर्च, तसेच वाहतूक खर्च वाढल्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला वाहनक्षेत्राला मोठ्या भुदंड बसत आहे. त्यामुळे वाहन दुरुस्तीही महागली आहे वाहनांचे बहुतांश सुटे भाग स्टीलपासून बनतात. स्टीलच्या किमती वर्षभरात 40 रुपयांवरून 65 रुपयांवर गेल्या आहेत. त्यात सुमारे 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातच लेबर कॉस्ट वाढल्यामुळे त्याचा परिणाम वाहनांचे सुटे भाग महागण्यावर झाला आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या सर्व सुट्या भागांच्या किमतीत 20 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी मोपेड पालक वाहनांची खरेदी करतात. कोरोनामुळे शाळा-कॉलेजेस बंद असल्यामुळे ही खरेदी बंद झाली. त्यातच पेट्रोल-डिझेल महागल्यामुळे अनेकांनी इलेक्ट्रिक व्हेईकलकडे मोर्चा वळविला आहे. विद्यार्थी, कामगार यांच्यासारख्या ठराविक असणाऱ्यांकडून प्रवास अशा बॅटरीवरील वाहनांना पसंती दिली जात आहे.
येत्या काळात शहरी भागात या वाहनांची मागणी 30 ते 40 टक्के वाढण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली. परंतु, भारतात लिथियमचा तुटवडा आहे. ते चीनवरून मागविले जाते. त्यामुळे येत्या काळात लिथियम बॅटरीचाही तुटवडा भासण्याची शक्यता वाढल्याने ही वाहने महाग होऊ शकतात. मार्च 2021 नंतर सरकारने युरो सिक्स वाहने बंधनकारक केली. हे तंत्रज्ञान नवीन असल्यामुळे त्याचे सुटे भाग महाग मिळत आहेत. शिवाय त्याचा तुटवडाही आहे. हे स्पेअर पार्ट आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
सेकंडहॅण्डला आला भाव
बरीच वाहने भंगारात टाकून दिली जातात. भंगार मालक अशा वाहनांचे स्पेअरपार्ट वेगळे करतात. टायर, चेन, मिरर, कमी झिज झालेले पण वापरता येईल असे साहित्य भंगारमालकाकडे वाजवी दरात सहज उपलब्ध होते. त्यामुळे ग्राहकांकडून आता सेकंडहॅन्ड स्पेअरपार्टची मागणी वाढली आहे.
सुट्या भागांची विक्रीही घटली
सुटे भाग महागल्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला भुदंड बसत आहे. परिणामी, खूपच गरज असेल तरच वाहनांना नवीन सुटे भाग टाकले जात आहेत. त्यामुळे स्पेअर पार्ट विक्रेत्यांच्या व्यवसायातही 30 ते 40 टक्क्यांची घट झाली आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेले अर्थचक्रही कोलमडले आहे.







