नाशिक: कोरोनाच्या संकटानंतर सर्वच क्षेत्रात महागाईचा भडका उडाला आहे. खते, बियाणे, कीटकनाशके याबरोबरच मजुरीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचा एकरी पीक पेरणीचा खर्च अव्वाच्या सव्वा झाला आहे. कोणतेही पीक घेतले तरी त्याला लागणारा खर्च करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.
पोटाला पिळा देऊन शेतकरी तो सहनही करतात; पण मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकाला बाजारात मिळणारा भाव पाहिला तर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. केंद्र शासनाने यावर्षीही प्रत्येक पिकाला हमी भाव जाहीर केला आहे. महागाई ज्या झपाट्याने वाढते आहे, त्या तुलनेत दरवाढ होत नसल्याने एखाद्या वर्षी शासनाने शेती कसून पाहावी असे म्हणण्याची वेळ आली आहे.
एकरी खर्च चार हजारांनी वाढला
महागाईमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. ट्रक्टरचालकांनी यावर्षी एकरी १७०० रुपये नांगरणीचे दर वाढविले आहेत. गतवर्षी दर २००० – २२०० रुपये एकरी होते. खतांच्या किमती २० ते ३० तर बियाण्याच्या किमती ८ ते १० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
उत्पादन खर्च विचारात का घेतला जात नाही?
कोणत्याही पिकाचे हमीभाव ठरविताना शेतकऱ्यांच्या रोजंदारीचा खर्चही विचारात घेतला जात नाही. याशिवाय हमीभाव ठरविण्याचे निकषही चुकीचे असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे. उत्पादन खर्चाचा विचार करून हमीभाव ठरवावा, अशी मागणी होत आहे.
सर्वच ठिकाणी वाढली महागाई
- बियाणे : यावर्षी शासकीयसह खासगी बियाणे उत्पादक कंपण्यांनी सर्वच पिकांच्या बियाण्यांच्या किमती ५ ते १० टक्क्यांनी वाढविल्या आहेत. यामुळे मागीलवर्षीपेक्षा तो खर्च वाढला आहे.
- रासायनिक खते : खरिपात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर हात असतो. यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. शेणखत दरातही वाढ झाली आहे.
- मजुरी : डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर चालकांनी मशागतीच्या सर्वच कामांचे दर वाढविले आहेत. याशिवाय मजुरांच्या टाळ्यांनीही पेरणी, सोंगणी, निंदणी, खुरपणी या कामांचे दर वाढविले आहेत. रोजंदारीवर काम करण्यापेक्षा अंगावर घेऊन काम करण्याची प्रथा वाढली आहे.
शेतकरी काय म्हणतात….
एकीकडे महागाई भरमसाठ वाढत आहे मात्र त्या तुलनेत पिकांना मिळणारा भाव पाहिला तर बांधावर उभे राहून मजा पाहाणारांना चांगले दिवस आले आहेत, असेच म्हणण्याची वेळ आली आहे. अशोक दौंडे, शेतकरी.
एकराला तीन ते चार गोण्या रासायनिक खत वापरले तर खरिपात काहीतरी पीक हाती लागते. पावसाने ताण दिला तर केलेला खर्च वाया जाण्याचीही भीती असते. यामुळे एकदा राज्यकर्त्यांनीच शेती करून पाहावी. निवृत्ती पवार, शेतकरी.
आंब्याच्या रोपाचा दर ८० रुपये; रोपवाटिकेत मात्र २५० रुपयाला