नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेने भारतात कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केल्यानंतर देशातील आरोग्यतज्ज्ञांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोविड कार्यसमूहाचे प्रमुख डॉ. एन. के. अरोडा यांनी डब्ल्यूएचओची आकडेवारी निरर्थक, तथ्यहीन असल्याची टीका करत या अहवालावर चिंता व्यक्त केली.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनामुळे सुमारे सव्वापाच लाख लोकांचा मृत्यू झाला, तर जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत भारतात कोरोनामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे ४७ लाख जणांचा मृत्यू झाला. भारताच्या आकडेवारीपेक्षा ही संख्या सुमारे दहापट अधिक आहे. डब्ल्यूएचओचा हा दावा भारताला मान्य नाही. डब्ल्यूएचओची आकडेवारी हास्यास्पद, तथ्यहीन, निरर्थक असल्याची प्रतिक्रिया अरोडा यांनी दिली. भारतात जन्म-मृत्यूची नागरी नोंदणी यंत्रणेद्वारे (सीआरएस) नोंदणी केली जाते. ही एक खात्रीशीर यंत्रणा आहे.
सीआरएसद्वारे २०१७च्या तुलनेत २०१८ साली ५ लाख अतिरिक्त बळींची नोंद करण्यात आली. २०१८ च्या तुलनेत २०१९ साली ७ लाख अधिक बळींची नोंद झाली. २०१९ च्या तुलनेत २०२० साली ५ लाख अधिक बळी नोंदवण्यात आले. याचा अर्थ बळींच्या = नोंदींमध्ये वर्षागणिक सुधारणा झाली आहे. सध्या ९८ ते ९९ टक्के मृत्यूंची सीआरएसद्वारे नोंद होते. एवढे असूनही १०-२० टक्के तफावत असू शकते; मात्र डब्ल्यूएचओची – आकडेवारी पाहता प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे, असे अरोडा म्हणाले. देशातील कोरोना काळातील ५ लाख बळींपैकी दीड लाखाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. उर्वरित तीन लाख मृत्यू इतर कारणांमुळे झाले आहेत.
आपण अजून अतिरिक्त चार लाख बळी जरी धरले तरी डब्ल्यूएचओच्या दाव्यामध्ये अतिशयोक्ती असल्याचे स्पष्ट होते, असा मुद्दा अरोडा यांनी मांडला. तसेच आमच्या आकडेवारीपेक्षा ४२ लाख अतिरिक्त मृत्यू झाले आहेत, तर त्या मृतांचे नातेवाईक आर्थिक मदतीच्या दाव्यासाठी पुढे का आले नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भारताला आपल्या एक अब्ज लोकसंख्येच्या लसीकरणासाठी ५ वर्षे लागतील, असा दावा पाश्चिमात्य तज्ज्ञ करत होते; मात्र आम्ही हा दावा खोटा ठरवला, असे अरोडा म्हणाले.
– कोरोना संसर्गानंतर ६ महिने ब्लड क्लॉटचा धोका जास्त!