अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे नारळ, सुपारी बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. या नैसर्गिक संकटातून बागायतदार आता सावरला असला तरी, त्याच्या अडचणी अद्याप सुटलेल्या नाहीत. नारळ, सुपारी बागा उद्ध्वस्त झाल्याने शासनाने नव्याने बागायत फुलविण्यासाठी नारळ, सुपारीची रोपे दिली. मात्र त्याचे पैसे शासनाने देणे अपेक्षित होते; पण शासनाने रोपवाटिकाचालकांना पैसे न दिल्याने बागायतदार शेतकऱ्यांकडूनच पैशाची वसुली केली जात आहे. त्यातच आता राज्य सरकारमध्ये राजकीय भूकंप झाला असल्याने शेतकऱ्यांचे पैसे मिळणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी निसर्ग चक्रीवादळ आले आणि वाताहत करून गेले. लाखो घरे उद्ध्वस्त झाली. खासगीसह शासकीय मालमत्तेची हानी झाली. नारळ, सुपारी बागायतदार तर नुकसानीमुळे पुढील पंधरा वर्षे उत्पादनापासून वंचित झाले.
निसर्गानंतर शासनाने तुटपुंजी का होईना मदत देण्यात आली. बागायतदार यांना शासनाकडून रोपे देण्यात आली. शासकीय रोपवाटिकांमधील रोपं कमी पडल्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून खासगी नर्सरीकडून रोपांचा पुरवठा करण्यात आला.
खासगी नर्सरीने बागायतदारांना रोपे दिली असली, तरी दोन वर्षे झाली शासनाने त्याचा निधी दिलेला नसल्याने शेतकऱ्यांकडून वसुली केली जात आहे. त्यामुळे शेतकरी बुचकळ्यात पडले आहेत. ही रक्कम आपल्याला परत मिळेल, असं सांगितलं जातंय. परंतु अद्यापही याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.
कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता, खासगी रोपवाटिकांचे पैसे अद्याप सरकारकडून आले नसल्याचे सांगण्यात आले. पुनरुज्जीवन आणि पुनर्लागवडीचे मिळून अलिबाग तालुक्यात २ कोटी रुपये सरकारकडून येणे बाकी आहे.
निसर्ग वादळात बागायतीचे नुकसान झाले. नारळ, सुपारीची रोपे पुन्हा लागवड करण्यासाठी कृषी विभागाने खासगी नर्सरीमधून घेण्यास सांगितले. मात्र नर्सरीमालकांना शासनाने पैसे दिले नसल्याने आमच्याकडून वसूल केले जात आहेत. त्यामुळे शासनाने कबूल केलेले आमचे पैसे लवकरात लवकर द्यावेत, ही विनंती.. – प्रणय घरत, बागायतदार.
बागायतदारांना कृषी विभागाच्या सूचनेनुसार रोपे दिली. मात्र शासनाकडून अजूनही निधी आला नसल्याने या रोपांचे सुमारे १२ ते १३ लाख रुपये आम्हाला येणे आहेत. १० टक्के बागायतदारांनी पैसे अदा केले. त्यामुळे उर्वरित पैशासाठी सदर निधींच्या आम्हीदेखील प्रतीक्षेत आहोत. – हेमंत पाटील, नर्सरीचालक.
आंब्याच्या रोपाचा दर ८० रुपये; रोपवाटिकेत मात्र २५० रुपयाला