टरबुजाला खर्च केला दीड लाख, मिळाले ६० हजारांचे उत्पन्न!

watermelon

बीड : कोरोना संपल्यानंतर खुललेल्या बाजारपेठेत टरबूज पिकाला चांगला भाव मिळेल या आशेने दोन एकरांवर टरबूज लागवड केली. मात्र, दीड लाखाहून जास्त खर्च करणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी मात्र ५० हजार रुपये पडल्याने या बागायतदाराची निराशा झाली. ही व्यथा आहे धारूर तालुक्यातील देवदहिफळच्या आसाराम विठ्ठल कांदे या अल्पभूधारक शेतकऱ्याची.

आसाराम कांदे यांनी दोन एकर शेतात मार्च महिन्यात रसिका नावाचे बी मोठ्या आशेने लावले. २५ हजार रुपयांचे बी, शेती मशागतीसाठी दहा हजार, मल्चिंगसाठी पंधरा हजार, खते व फवारणीसाठी ७० हजार, तर मजुरीसाठी ४० हजार रुपये, असा एकूण १ लाख ४५ हजार रुपये खर्च दोन एकर टरबुजाच्या बागेसाठी या शेतकऱ्याला आला. मात्र, फळ निर्यातीच्या बाजारभाव ढासळल्याने नफ्याऐवजी ८० हजार रुपये तोटा आला. जेमतेम एप्रिल महिन्यात दहा ते अकरा रुपये किलो असलेला दर अडीच ते तीन रुपये किलोपर्यंत ढासळला. दोन एकर बागेत केवळ ६० हजारांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळाले. त्यामुळे ८० हजार रुपयांचा तोटा’ सहन करावा लागल्याने शेतकऱ्याच्या पदरी निराशा पडली आहे.

भाव नसल्याने निराशा

५० टक्के व्यापाऱ्यांनी नेला अन् २५ माल वाया गेला. टरबुजाची निर्यात ही ठरलेली असते. मोठ्या बाजारपेठेतील व्यापारी केवळ तीन ते सहा किलो वजनाची आकाराने मोठी फळे घेऊन जातात. छोटी व वजनाने हलकी फळे व्यापारी फडात टाकून जातो. ही फळे नंतर फेकून द्यावी लागतात.

मी जवळपास दीड लाख रुपये खर्च करून दोन एकर टरबुजाची बाग जोपासली. मला किमान तीन लाख रुपये उत्पन्न होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाव कमी झाल्याने ६० ते ७० हजार रुपये माझ्या पदरी पडले, असे शेतकरी आसाराम कांदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कापूस बियाणासाठी तेलंगणात धाव, बोगस बियाणे येण्याची भीती