हवामानाचा वेध घेण्यासाठी फुग्यांऐवजी ड्रोनचा वापर

drones

नवी दिल्ली: हवामान आणि बदलत्या वातावरणाची दैनंदिन माहिती गोळा करण्यासाठी हवामान विभागाकडून फुग्यांऐवजी लवकरच ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. या दृष्टिकोनातून ड्रोन तंत्रज्ञानाची चाचपणी केली जात असल्याची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने बुधवारी दिली. हवामान विभागाकडून देशभरातील वेधशाळांमार्फत दररोज हवामानविषयक आकडेवारी गोळा केली जाते.

यासाठी देशभरातील ५५ ठिकाणांहून दिवसातून दोन वेळा हायड्रोजन किंवा हॅलोजनयुक्त फुगे हवेत सोडले जातात. या फुग्यांना एक ‘रेडिओसाऊंड’ नामक टेलिमेट्री उपकरण बांधलेले असते. या उपकरणाद्वारे वातावरणातील दबाव, तापमान, हवेची दिशा आणि वेग यासारख्या गोष्टींचा आढावा घेतला जातो. जवळपास १२ किमीच्या उंचीपर्यंत जाणारे हे फुगे रेडिओ सिग्नलद्वारे जमिनीवरील केंद्रांना माहिती पाठवत असतात; मात्र यातील सर्वांत मोठी अडचण म्हणजे हवेत सोडण्यात आलेले फुगे आणि उपकरण पुन्हा हाती लागत नाही आणि ही पद्धती खर्चिक ठरते. त्यामुळे आता हवामानासंबंधीच्या भविष्यवाणी व आकडेवारीसाठी ड्रोनच्या वापराबाबत चाचपणी केली जात आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी दिली.

हवामान विभागाकडून देशभरातील ५५० हवामान केंद्रांवरून फुग्यांच्या मदतीने दररोज हवामानाची आकडेवारी गोळा केली जाते. या माहितीचा वापर हवामानासंबंधीचा अंदाज वर्तवण्यासाठी केला जातो; पण फुग्यांच्या तुलनेत ड्रोनला नियंत्रित करणे शक्य असल्याने ते अधिक फायदेशीर ठरण्याची आशा आहे. पाच किमी उंचीपर्यंतचा डेटा गोळा करण्यासाठी ड्रोनचा वापर करत पारंपरिक फुग्यांद्वारे एकत्रित केल्या जाणाऱ्या माहितीसोबत त्याची तुलना करण्याची हवामान विभागाची योजना आहे.
शेतकऱ्यांनो गच्चीवर करा वीज निर्मिती, बिलापासून मुक्ती; शासनाच्या वतीने ४० टक्के अनुदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here