तोतापुरी, बदामी आंब्याचा हंगाम आला शेवटच्या टप्प्यात

mango
Photo: Social media

पिंपरी : हापूसचा हंगाम मे महिन्यातच संपल्याने तोतापुरी, बैगम पल्ली म्हणजे बदामी आणि गुजरातच्या दशेरी आंब्याला चांगली मागणी असल्याचे फळ विक्रेते सांगत आहेत.

या आंब्यांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, आठ दिवसांनंतर हे आंबे मिळणार नाहीत. विशेष म्हणजे ग्राहकांच्या खिश्याला परवडेल या भावात या आंब्यांची विक्री होत आहे. आंब्यांची किरकोळ विक्री करणाऱ्या इलियास शेख याने सांगितले की, तोतापुरीला ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. किलोप्रमाणे या आंब्यांची विक्री होत असून, दीड किलोला १०० रुपये भाव आहे. साधारणपणे दिवसाला ४० ते ५० किलो आंब्याची विक्री माझ्याकडून होत आहे. एका किलोत मोठे तीन, तर छोटे पाच आंबे येतात.

बैगम पल्ली म्हणजे बदामी आंबा आणि गुजरातचा दशेरी आंबादेखील १०० रुपये किलोने विक्री केला जात आहे. तोतापुरी एवढी या आंब्याला मागणी नाही. मात्र, चोखंदळ ग्राहक या आंब्यासाठी आग्रही असल्याचे आतिक पठाण यांनी सांगितले.

किरकोळ बाजारात तोतापुरी १०० ते १५० रुपये किलोने विक्री होत असला तरी गुलटेकडीच्या घाऊक बाजारात ४० ते ५० रुपये किलोने तोतापुरी आंब्याची विक्री होत आहे. हाच भाव इतर आंब्यांना असल्याचे किरकोळ विक्रेते सांगत आहेत.

विक्रेत्यांनी सांगितले की, ग्राहक २कात्खरेदी करण्यासाठी येतो तेव्हा सर्वात मोठी अडचण असते की त्यांना खरेदी केलेला आंबा कोणत्या पिशवीत द्यायचा. कारण बहुतांश ग्राहक हे कापडी पिशवी घेऊन येत नाहीत. प्लॅस्टिकच्या पिशवीवर बंदी असल्यानें कापडी पिशवीत आंबा दिल्यास ग्राहक जादा पैसे देत नाही. थोडे नुकसान सहन करावे लागते.
इंधन दरवाढीला केंद्र, राज्याकडून दिलासा; मात्र खाद्यतेलांचे दर वाढलेलेच