मुंबई : केरळमधील ५ वर्षांखालील मुलांमध्ये टोमॅटो तापाची लागण होत आहे. कोल्लम जिल्ह्यातील आर्यनकावू, आंचल आणि नेदुवाथूरसारख्या भागात अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केरळच्या आरोग्य विभागाने राज्यभर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या ८२ रुग्णांची नोंद झाली असून, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता रुग्णांची संख्या वाढू शकते. या टोमॅटो फ्लूने मुंबई व जवळच्या शहरातील पालकांची झोप उडवली असून अनेक पालक हे डॉक्टरांशी संपर्क साधत आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना आरोग्यतज्ज्ञांनी म्हटले, कोरोना महामारीनंतर आलेल्या या टोमॅटो तापाने पालकांची झोप उडवली आहे. मुख्यतः या टोमॅटो तापाची लक्षणे आपल्याकडे पावसामध्ये लहान मुलांना होणाऱ्या आजाराशी समान आहेत. केरळमध्ये आढळलेला टोमॅटो फ्लू हा विषाणूजन्य संसर्ग असून हात, पाय, तोंडाला (हॅण्ड फूट व माऊथ) पुरळ येऊन ताप येतो, सर्वसाधारण ५ वर्षांखालील मुलांना याचा संसर्ग होतो, परंतु ७ ते ८ वर्षांवरील मुलांमध्ये सुद्धा ही लक्षणे आढळून येतात. या फोडांचा आकार सामान्यतः लाल असतो, म्हणून त्याला टोमॅटो फ्लू असे नाव दिले आहे.
वैद्यकीय भाषेत टोमॅटो फ्लू हे व्हायरल इन्फेक्शन आहे की चिकनगुनिया किंवा डेंग्यूच्या संसर्गामुळे होते, हे सांगणे कठीण आहे. मुंबईत गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये अशा प्रकारचे रुग्ण आढळून आले होते. परंतु यांची संख्या फार कमी होती तसेच त्यावेळी कोरोना महामारीची दहशत नव्हती. आता कोरोनानंतर कुठल्याही संसर्गजन्य आजाराची पालकांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे. पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळून येणाऱ्या या आजाराची लागण या अगदी नऊ वर्षांच्या मुलांनाही झाल्याचे पाहण्यात आले.
त्यामुळे अंगावर तसेच मुख्यतः हात पाय व तोंड तर कधी कधी तोंडामध्ये पुरळ आले तर लगेच वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे. अनेकवेळा पुरळ म्हणजे कांजण्याची लक्षणे आहेत, असा पालकांचा गैरसमज होतो. या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नसून योग्य ती काळजी घेतल्यास हा आजार १० दिवसात बरा होतो, तसेच सध्या मुंबईत अशा रुग्णांची नोंद झालेली नाही, असेही आरोग्यतज्ज्ञांनी म्हटले आहे.
– अमेरिकेच्या संशोधकांनी समुद्रात शोधले ५,५०० नवे व्हायरस