गुवाहाटी: आसाममध्ये पुराने भीषण थैमान माजवले असून, राज्यातील ३५ पैकी ३३ जिल्ह्यांतील जवळपास ४३ लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सोमवारी कॅबिनेट सहकारी आणि वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांसोबत पूरस्थितीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी बचाव अभियानाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
राज्यात पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमधील बळींचा आकडा ७३ वर गेला आहे. मृतांमध्ये बचाव अभियान राबवत असलेल्या ठाणेप्रमुखासह दोन पोलीस कर्मचान्यांचा समावेश आहे. सरमा यांनी डिजिटल बैठकीद्वारे पूरस्थितीचा आढावा घेताना सर्वांत भीषण स्थितीचा सामना करत असलेल्या भागात हवाई मार्गाने अन्नपदार्थाांचे वितरण करण्याचे आदेश दिले. पुरामुळे आसाममधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, लोकांना अन्नपाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे लष्कर, एनडीआरएफ तथा एसडीआरएफच्या नौका जाऊ न शकणाऱ्या पूरग्रस्त भागात हवाई मार्गाने अन्नपदार्थांचे पॅकेट टाकण्यात यावीत, अशा सूचना सरमा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सोबत आरोग्य विभागाचे पथक सज्ज ठेवण्याबरोबर आश्रय शिबिरांमध्ये डॉक्टरांच्या दैनंदिन फेऱ्या सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांची विशेष काळजी घेण्याचे आणि पूर ओसरल्यानंतर निर्माण होणाऱ्या रोगराईचे संभाव्य संकट टाळण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मदतीने आवश्यक तयारी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. गत आठवडाभरापासून पुराचा सामना करत असलेल्या आसाममध्ये नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जवळपास १.९० लाख लोकांनी ७४४ शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. लष्करी जवान आणि एनडीआरएफच्या पथकाइन युद्धपातळीवर पूरग्रस्त भागात बचाव अभियान राबवले जात आहे.