नवी दिल्ली: केंद्र सरकारने मार्च महिन्यात संपुष्टात येणाऱ्या मोफत अन्नधान्य योजनेला अजून सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आता सप्टेंबर महिन्यापर्यंत रेशन दुकानावर मोफत धान्य मिळेल. कोरोना महामारीच्या काळात गरीबांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. यानंतर सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्नधान्य योजनेचा (पीएमजीकेएवाय) कालावधी सप्टेंबरपर्यंत वाढवल्याची माहिती केंद्रीय अन्नमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवरून दिली. कोरोना महामारी संपुष्टात येत असतानाही सरकारने योजनेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यातून मोदी सरकारची गरीबांप्रतिची
संवेदनशीलता दिसून येते, असे गोयल म्हणाले. ही योजना मार्चअखेरला संपुष्टात येणार होती. सप्टेंबरपर्यंतचा कालावधीत गृहीत धरता या योजनेंतर्गत एकूण १००३ लाख टन अन्नधान्याचे वितरण केले जाईल. यामुळे सरकारी तिजोरीवर एकूण ३.४ लाख कोटींचा भार पडेल. उल्लेखनीय म्हणजे कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर सरकारने मार्च २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ८० कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य देण्यासाठी ही योजना सुरू केली होती.
याअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला महिन्याकाठी ५ किलो अन्नधान्य मोफत दिले जात आहे. या योजनेचा कालावधी यापूर्वी अनेक वेळा वाढवण्यात आला आहे. पहिल्या पाच टप्प्यात २.६ लाख कोटींच्या ७५९ लाख टन अन्नधान्याचे राज्यांना वितरण करण्यात आले आहे.
– माजी आमदारांच्या एकापेक्षा जास्त पेन्शनला पंजाब सरकारची कात्री; कितीही वेळा आमदार असले तरी एकच पेन्शन: मुख्यमंत्री भगवंत मान