पुढील पाच दिवस पावसाचेच! जनजीवन विस्कळीत ; एक दिवसाच्या विश्रांतीनंतर वरुणराजाची पुन्हा हजेरी

rain-weather

नाशिक : गेल्या आठवड्यापासून नाशिककरांना धो-धो धुणाऱ्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली होती. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले होते. पाऊस आता विश्रांती घेईल, असे वाटत असताना सोमवारी सकाळपासून आषाढ सरी कोसळण्यास सुरुवात झाली आणि जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले. शहरात दिवसभरात १७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील ५ दिवस नाशिक जिल्ह्यात पुन्हा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेने रविवार, १७ जुलै विश्रांती घेतली. सकाळी लख्ख ऊन पडले. पावसाच्या रिपरिपमुळे त्रस्त नागरिकांनी रविवारी वीकेंड पर्यटनाचा आनंद घेतला, तसेच दुकानांमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी व्यावसायिकांची लगबग सुरू होती. त्यातच सोमवारी पुन्हा दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीतही काहीशी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. पावसाच्या पुनरागमनामुळे गोदाकाठावरील दुकानदारांनी पुन्हा आपली आवरासावर बंद करत दुकाने लावणेच पसंत केले. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने धरणातील साठे अन् विसर्गासाठीच्या नियोजनाची धावपळ सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, भावलीसह प्रमुख धरणांच्या पाणलोटमध्ये सातत्याने पाऊस पडत आहे. दुसऱ्या बाजूने धरणांतील साठे ही आताच ७० टक्क्यांच्या जवळपास गेले आहेत. पुढील २ महिने पावसाचे शिल्लक असल्याने अधिक पाणी धरणांत ठेवता येत नसल्याने विसर्ग करावाच लागत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत गंगापूरमधून १३७७ क्यूसेक, दारणा ४०३४, कडवा ६४७, वालदेवी २४१, आळंदी ४४७, भोजापूर ५४० आणि त्यामुळे नांदूरमध्यमेश्वरमधून ३८ हजार ३३८ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. हे सर्व पाणी गोदावरी मार्गे जायकवाडीला वाहून जात असल्याने जायकवाडीचा साठाही ६५ टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे.

नाशिकमधून जायकवाडीच्या दिशेने २९.१०९ टीएमसी पाणी
दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरणे तुडुंब झाली असून, जुलै महिन्यात पडलेल्या पावसातच ७० टक्क्यांवर साठा गेल्याने विसर्गही करावा लागत आहे. त्यानुसार आतापर्यंत नाशिकमधून जायकवाडीच्या दिशेने २९.१०९ टीएमसी इतके पाणी वाहून गेले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत मिळून ७६.८७ टक्के उपयुक्त साठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी तो २३ टक्केच होता. म्हणजे तब्बल ५३ टक्के जादा पाणी उपलब्ध झाले आहे.
गोगलगायीनंतर कापूस पिकात आकस्मिक ‘मर’चे प्रमाण वाढण्याची शक्यता