Homeताज्या बातम्याशेती करायची की, सोडून द्यायची…? युध्दाचे कारण सांगून सरकारने शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर

शेती करायची की, सोडून द्यायची…? युध्दाचे कारण सांगून सरकारने शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर

कोल्हापूर : देशात महागाईने कहर केला आहे, त्यातून शेतीही सुटलेली नाही. खते, औषधांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी होरपळून गेला असून, शेती कसायची तर हातात पैसा नाही, सोडायची तर पोराबाळांच्या पोटाला काय घालायचे, असा यक्ष प्रश्न घेऊन शेतकरी शेतीचा गाडा ओढत आहे. महागाई वाढली की सांगायचे कुणाला, राज्यकर्त्यांना सांगायचे तर ते रशिया युक्रेनमधील युद्धाकडे बोट दाखवून रिकामे होतात.

युद्ध दोन परकीय देशांचे, त्याची झळ आपल्या देशातील जनतेला बसू नये, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी राष्ट्रप्रमुखाची, पण तेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहेत. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला शेतकऱ्यांना बांधत आहेत. याचा परिणाम शेतीच्या अर्थकारणावर झाला असून, युद्ध जरी रशिया युक्रेनमध्ये असले, तरी भारतीय शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

कृषी प्रधान देशात स्वातंत्र्यानंतर शेती एवढी आर्थिक अरिष्टात कधीच सापडली नव्हती. सरकार एकीकडे उत्पादन वाढीचा आग्रह धरत असताना दुसऱ्या बाजूला त्यासाठी लागणाऱ्या आनुषंगिक गोष्टीबाबत कमालीची उदासीनता दाखवली जात आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत कीटकनाशक, तणनाशक व खतांच्या दरात झालेल्या वाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेती करायची की सोडून द्यायची, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

आधुनिक शेतीकडे वळत असताना शेतीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. शेतात राबणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने यांत्रिकीकरण आले असले तरी त्यासाठी लागणारा खर्च काही कमी नाही. भांगलण करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने तणनाशकांचा वापर करावा लागत आहे. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत तणनाशकांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

त्याचबरोबर खतांनी मोठी झेप घेतली असून, बहुतांशी खतांचे दर १५०० रुपयांच्या पुढे आहेत. याचा एकत्रित परिणाम शेतीच्या गणितावर झाला आहे. महागडी खते घालून उत्पादन किती घ्यायचे? असा प्रश्न आहे. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीची खते व तणनाशकांचा वापर करून पिकविलेले पीक काढणीपर्यंत टिकेल का? टिकले तर बाजारात योग्य भावात विकेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शेतकऱ्यांकडे नाहीत.

शेतीला इतके वाईट दिवस कधीच आले नव्हते. खते, बियाणे, वीज सगळ्यांची दरवाढ झाली, मात्र आमच्या पिकांना हमीभाव नाही. आतबट्ट्यातील शेतीकडे नवीन पिढी येणार नाही. -सर्जेराव पाटील (शेतकरी, गडमुडशिंगी).
कांदाभावप्रश्नी घेराव! कांदा उत्पादक संघटनेने विचारला नाफेड अधिकाऱ्यांना जाब

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post