दर स्थिर ठेवण्यासाठी गहू निर्यातीवरील निर्बंध कठोर! बाजार समित्यांमध्ये तेजी, दिवाळीनंतर निर्यातीची शक्यता

wheat
Photo: Social media

औरंगाबाद:सद्यस्थितीत गव्हाच्या आयातीबाबत कोणताही निर्णय होणार नाही. दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून निर्यातीवर कठोर निर्बंध लादले जात आहेत. दिवाळीपर्यंत बाजारातील गव्हाचे दर स्थिर ठेवण्यासाठी गहू, पीठ, मैदा, रव्याची निर्यात अपवादात्मक परिस्थितीत केंद्राच्या परवानगीने करता येणार आहे.

औरंगाबादसह सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या घाऊक विक्रीचे दर दर्जानुसार २३ ते २७ रुपये आहेत. किरकोळ विक्रीचे दर २९ ते ३४ रुपयांपर्यंत आहेत, अशी माहिती गहू, पीठ, रवा, मैद्याच्या निर्यातदारांसह व्यापाऱ्यांनी दिली. सध्याचे दर तेजीतच आहेत. पण, किमान आहेत ते दर दिवाळीपर्यंत स्थिर ठेवण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. सणासुदीच्या काळात आणि विशेषकरून दिवाळीत दरवाढ झालीच तर सरकार आपल्या खाद्य महामंडळाच्या गोदामातील गव्हाची खुल्या बाजारात विक्री करू शकते. पण, कोणत्याही परिस्थितीत आयात शक्य नाही. गहू आयात झाला, तर गव्हाचे दर धडाधडा कोसळतील, शेतकरी त्याला मोठा विरोध करतील. त्यामुळे सध्या कठोर निर्यात बंदी इतकीच उपाययोजना केंद्र सरकार करू शकते, असे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले.

केंद्र सरकारलाही गहू मिळेना
जागतिक परिस्थितीचा परिणाम म्हणून गव्हाच्या दरात तेजी येऊन देशातून निर्यातीत प्रचंड वाढ झाली. केंद्र सरकारलाही आपल्या कल्याणकारी योजनांसाठी गहू मिळेना, त्यानंतर खडबडून जागे झालेल्या केंद्राने १३ मेपासून गव्हाची निर्यात बंदी केली. देशातील व्यापाऱ्यांनी गहू निर्यात बंद होताच गव्हाचे पीठ, रवा, मैद्याच्या निर्यातीत प्रचंड वाढ केली. ही निर्यात इतकी प्रचंड होती की, गतवर्षीच्या तुलनेत २७४ टक्के वाढ झाली. गतवर्षी सुमारे २ हजार ४७० लाख डॉलर किंमतीच्या पिठाची निर्यात झाली होती. यंदा फेब्रुवारी ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २१२ कोटी डॉलर किंमतीची निर्यात झाली होती. त्यामुळे झोपलेले सरकार पुन्हा जागे झाले आणि ८ जुलैला पीठ, मैदा, रव्याच्या निर्यातीवरही बंदीचा निर्णय घेतला. ही बंदी १२ जुलैपासून अमलात आली. आता १४ ऑगस्टपासून निर्यातबंदीचे निकष अधिक कडक केले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
आणखी वाचा : कांदा चाळीसाठी दीड लाखाचे अनुदान यावे! कृषी समितीच्या मासिक बैठकीत ठराव करून शासनास पाठवण्याचा निर्णय