वाशिम : पावसाळ्याला सुरुवात झाली असताना सोयाबीनच्या मागणीत वाढ झाली आहे. त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने सोयाबीनचे दर वाढत असून, स्थानिक बाजार समित्यांत शनिवारी आणि सोमवारी सोयाबीनला सरासरी ६,५०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळाले. दर वाढले असतानाही बाजारात आवक मात्र कमी होत असल्याचे दिसून आले.
गत दीड महिन्यापूर्वी साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर सोयाबीनला मिळत होते. परंतु शासनाने पुढील दोन वर्षांकरिता कच्च्या सोयाबीन आणि कच्च्या सूर्यफूल तेलाची शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिल्यानंतर सोयाबीनच्या दरात प्रचंड घसरण सुरू झाली आणि सोयाबीनचे दर सहा हजारांच्या खाली आले.
दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन साठविणाऱ्या शेतकऱ्यांची घोर निराशा दरातील घसरणीमुळे झाली, तर व्यापाऱ्यांनाही फटका बसला. आता मागणीच्या तुलनेत बाजार समित्यांत आवक कमी कमी होत असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ सुरू झाली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी समित्यांत सोयाबीनला सरासरी ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळाले.
मोजक्याच शेतकऱ्यांकडे सोयाबीन
बाजारातील तेजीचा विचार करून सोयाबीनचे दर दहा हजारांचा टप्पा ओलांडतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबवली होती. काहींनी तर गत महिन्यापर्यंत दरवाढीची प्रतीक्षा केली; परंतु दरात वाढ होण्याऐवजी घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी अखेर सोयाबीन विकले. आता अगदीच मोजक्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे.
सात हजारांचा टप्पा ओलांडणार
शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नसल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होत असून, ही तेजी आणखी काही दिवस कायम राहून सोयाबीनचे दर किमान सात हजार रुपये प्रती क्विटलचा टप्पा पार करण्याची शक्यता व्यापारीवर्गाकडून वर्तविली जात आहे.
दरवाढीचा फायदा काय गेले सात महिने नऊ हजारांचा टप्पा
ओलांडण्याच्या प्रतिक्षेत सोयाबीन साठवून ठेवत आर्थिक व्यवहार परस्परच केले; परंतु दरवाढीऐवजी दरात घसरण सुरू झाल्याने अखेर सोयाबीन विकले. त्यामुळे या दरवाढीचा आता काही फायदा नाही. – राजेश आसावा, सोयाबीन उत्पादक शेतकरी
सोयाबीनचे दर दहा हजारांचा टप्पा गाठतील या आशेने आठ महिने विक्री थांबवली; परंतु दरात घसरण सुरू झाल्याने अधिक नुकसान टाळण्याच्या भितीने सोयाबीन विकले. आता या दरवाढीला आमच्या लेखी अर्थ नाही. – नितीन उपाध्ये, शेतकरी.
बियाण्यांचे ४९ नमुने नापास, बाजारात विक्रीची शक्यता