धक्कादायक! पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट

soyabean
फोटो: सोशल मेडिया

चंद्रपूर: भद्रावती तालुक्यातील राळेगाव, मनगाव, पाटाळा परिसरात ओसवाल १११, बूस्टर, विक्रांत कंपनीचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. याचा आर्थिक फटकाही शेतकऱ्यांना बसला आहे.

मृग नक्षत्र सुरू झाले की शेतकऱ्यांची बाजारातून बी-बियाणे, खत खरेदी करण्याची लगबग सुरू होते. खरेदी केलेले बियाणे उगवणार की नाही, हे माहीत नसते. मात्र हे सांगता येत नसले तरी कृषी केंद्र मालक बियाणे चांगले असून उगवणारच, असे सांगून शेतकऱ्यांच्या माथी मारतात. दरवर्षी विविध प्रकारचे बियाणे उपलब्ध होत आहे. मात्र त्याची कधीही चाचपणी होत नाही.

राळेगाव, मणगाव, पाटाळा परिसरातील हनुमान खामनकर, संदीप चोपणे, संजय आगलावे या शेतकऱ्यांनी ओसवाल १११ या कंपनीचे, कैलास आवारी यांचे बूस्टर, बन्सी खामनकर यांचे ग्रीन गोल्ड, विक्रांत तर राळेगाव येथील संजय आवारी तर पुरुषोत्तम बोधाने, मारोती धगडी (पाटाळा) यांचे ओसवाल १११ व लटारी रांगणकर यांचे ओसवाल व बूस्टर या नामांकित कंपन्यांची बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र हे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला. हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकरी राजा दुबार पेरणीचे संकट पाहून हताश होताना दिसत आहे.

अनेक कंपन्यांचे बियाणे बाजारात

यावर्षी सोयाबीनला बऱ्यापैकी उतारा व भाव मिळाल्याने सोयाबीनचा पेरा वाढणार. याची संधी लक्षात घेता भरपूर कंपन्यांनी सोयाबीन बियाणे बाजारात आणले. पण याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. यावर आता तालुका कृषी विभाग किती तत्परतेने हा विषय हाताळतो व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देतो, याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, पीडित शेतकऱ्यांनी कृषी केंद्राकडे विचारणा केली असता कंपनीकडे बोट दाखवून स्वतःला सुरक्षित करत आहे.

बियाणे पेरून उगवलेच नाही. यासंदर्भात आम्ही कृषी केंद्रांना विचारणा केली असता कंपनीचे लोक पाहायला येतील. त्यानंतर कंपनीला योग्य वाटले तरच तुम्हाला मदत मिळेल, असे सांगतात. पण कृषी विभागाने जर बाजारात येणाऱ्या बियाण्यांचे नमुने घेऊन जर प्रयोगशाळेत उगवण शक्ती तपासून निकषांमध्ये पात्र असेल अशाच कंपन्यांना मान्यता दिली तर बोगस कंपन्याचे बियाणे कृषी केंद्रात येणार नाही व शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. – संदीप चोपणे, शेतकरी, मनगाव.
टोमॅटोपासून दिलासा, कोथिंबीर महागली