पिकांच्या अचूक नोंदीसाठी सातबाऱ्यात फेरबदल; पूर्वीचे रकाने रद्द करून नव्या स्तंभांत नमूद करणार माहिती

सातबारा
photo: social media

बुलढाणा : पिकांच्या अचूक नोंदी घेण्याकरिता शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यात आता फेरबदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सातबारातील पूर्वीचे ४ ते ७ स्तंभ आता रद्द होऊन त्या ठिकाणी पिकांचे प्रकार, पिकांचे नाव, जलसिंचन आणि अचलसिंचित पिके असे नव्याने काही स्तंभ समाविष्ट करण्यात येणार आहेत. लवकरच शासन दरबारी असणाऱ्या नोंदवह्या आणि दस्तही बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे या नव्या सातबारा उताऱ्यांची अंमलबजावणी झाल्यास पिकांच्या अचूक नोंदी आता दिसून येणार आहेत.

शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नोंदी योग्य पद्धतीने व्हाव्यात यासाठी पीक पेरणीची माहिती मोबाइल अॅपवर घेण्यात येते. शासनाने एका शासन निर्णयाद्वारे डिजिटल इंडिया लॅण्ड रेकॉर्ड मॉडरायझेशन अंतर्गत ई-फेरफारमध्ये बदल करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार टाटा ट्रस्टच्या साह्याने नव्याने तयार करण्यात आलेल्या मोबाइल अॅपचा वापर आता सर्वत्र वाढला आहे. त्यामुळे त्या नोंदी अचूक राहाव्यात तसेच त्या सातबारा उताऱ्यावर दिसून याव्यात यासाठी हा फेरबदल करण्यात येणार आहे. सध्याच्या गाव नमुना नंबर १२ पाहिला असता त्यामध्ये संदर्भातील क्रमांक १ मध्ये बदल करण्यात आला आहे.

मात्र, मिश्र पिकांखालील क्षेत्र या स्तंभामध्ये स्तंभ क्रमांक ४ मध्ये मिश्र पिकांचा सांकेतांक, स्तंभ क्रमांक ५ मध्ये जलसिंचित व स्तंभ क्रमांक ६ मध्ये अजलसिंचित असे स्तंभ आहेत. त्यामध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती नोंदविण्यात आली नाही. शेतकऱ्यांमध्येदेखील या स्तंभाबाबत संभ्रम असल्याचे दिसून आले आहे. गाव नमुना नंबर १२ वाचतांनाही तो सर्वसामान्य लोकांना समजत नाही. सध्या वापरात असलेल्या ई-पीक पाहणी मोबाइल अॅपमध्ये ही माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे सध्याच्या वापरात असलेला गाव नमुना नंबर १२ मध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी व तो शेतकऱ्यांना समजण्यासाठी सोपा करण्याची गरज होती.

यासाठी करावा लागला बदल
राज्यात गाव नमुना नंबर १२ मध्ये देखील वस्तुनिष्ठ पिकांच्या नोंदी घेण्यासाठी पारंपारिक पद्धतीने तलाठ्यांमार्फत पीक पाहणी नोंदवण्याची पद्धत बंद करून मोबाइल अॅपद्वारे ई- पीक पाहणीच्या माध्यमातून पारदर्शकपणे व अचूक नोंदी घेण्यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याची गरज होती. त्यामुळे सातबारा उताऱ्यावरील काही स्तंभ बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शेतीच्या मालकी दत्तापैकी प्रमुख असणाऱ्या सातबारा उतारामध्ये आता काही अंशी फेरबदल होणार आहेत. पीक पाण्याच्या नोंदी आता मोबाइल अॅपवर घेतल्या जातात. शेतकऱ्यांनी मोबाइल अॅपवर घेतलेल्या नोंदी सातबारा उताऱ्यावरही दिसून येणार आहेत हे विशेष!
हे पण वाचा : Solapur Onion Market : सोलापूर बाजार समितीत कांद्याचे दर गडगडले