हिंगोली : २३ व २४ रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. या दरम्यान, वादळी वारेही वाहू लागेल, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार २३ जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तर २४ जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाऱ्याचा वेग अधिक ताशी ४० ते ५० किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट सुरु झाल्यास शेतातील कामे आटोपती घ्यावी. पाऊस सुरु झाल्यास कोणीही झाडाखाली उभे राहू नये, असे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी केले आहे.
बुधवारी आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला असून हिंगोली जिल्ह्यात पहिल्याच दिवशी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील कळमनुरी, वारंगाफाटा, रामेश्वर तांडा व इतर भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहिले होते. मंगळवारीही जिल्ह्यात काही भागात पाऊस पडल्याचे वृत्त आहे.
बीडकर आनंदले, तासभर पडला पाऊस
बीड : पावसाची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना बुधवारी काहीसा दिलासा मिळाला. बीड शहरात दुपारी तीन ते चार या वेळेत एक तास, गेवराई तालुक्यातील शिरसदेवी येथे अर्धा तास, धारुरमध्ये दुपारी अर्धा तास तर केज तालुक्यातील आडस येथे पाऊस झाला. दरम्यान, मागील तीन ते चार दिवसांपासून आकाशात ढग जमा होतात, मात्र पाऊस पडत नव्हता. अशीच काही परिस्थिती बुधवारी सकाळी होती अन् दुपारी अचानक पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यावरील नाल्या तुडुंब वाहिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
बटाट्याची आवक; पण उठाव नाही! दिवाळीपर्यंत दर असेच राहणार