मराठवाडा, विदर्भात सर्वदूर पाऊस; या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

rain
फोटो: सोशल मिडिया

मुंबई: राज्यातील बहुतेक जिल्ह्यात रविवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर असल्याने विदर्भातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात विशेषतः हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत संततधार कायम होती. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर काहीसा मंदावला होता.

गडचिरोली, चंद्रपूरला रेड अलर्ट ; तीन जणांना जलसमाधी

गडचिरोली जिल्ह्यात रविवारी पुरात वाहून गेलेल्या ट्रकमधील तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. या ट्रकमध्ये पाच ते सहाजण असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. रविवारी सकाळी पती-पत्नीसह एका मुलीचा मृतदेह हाती लागला. त्यात सीताराम बिच्चू तलांडे (वय ५०), सम्मी सीताराम तलांडे (४५, दोघे, रा. कासमपल्ली, ता. अहेरी) आणि पुष्पा नामदेव गावडे (१४, रा. मोकोला, ता. भामरागड) या तिघांचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी पुलावर पाणी आल्याने कोरपना-आदिलाबाद मार्ग, तसेच चिमूर-वरोरा मार्ग बंद पडला आहे. चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे एका घराची भित कोसळली. जिवती तालुक्यात काही घरांत पाणी शिरले असून, शेकडो एकर जमीन पाण्याखाली आली आहे. पैनगंगा नदीही दुथडी भरून वाहत आहे. कोरपना तालुक्यातील नोकारी (बु.) येथील संजय राजाराम कंडलेवार (५०) हा इसम रविवारी नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला.

मराठवाडा : सर्वदूर संततधार

औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. जायकवाडी धरणात दोन हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून, यंदाच्या पावसाळ्यातील ही पहिलीच आवक आहे. नांदेड जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप होती. विष्णूपुरी प्रकल्पाच्या एका दरवाजातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

परभणीतही गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे, दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने सूर्यदर्शन झाले नाही. जालना आणि लातूर जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला.

कोयनेच्या साठ्यात तीन टीएमसीने वाढ

कोयना साठ्यात तीन टीएमसीने वाढ सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढू लागला आहे. कोयना धरणातील साठा सव्वातीन टीएमसीने वाढला आहे.

कोल्हापूर शहर तसेच आसपासच्या परिसराला गेल्या दोन दिवसांपासून झोडपून काढणाऱ्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. तरी पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी मात्र दीड फुटाने वाढली. पंचगंगा घाटावर पुराचे पाणी पाहण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी केली होती.

रत्नागिरी : गेले पाच-सहा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी सकाळपासून विश्रांती घेतली. त्यामुळे भातशेतीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यातील जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी सध्या इशारा पातळीवर आहे. तर वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, मुकुंदी, बाव नदी या नद्यांची पाण्याची पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

कणकवली : गेले पाच दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार बरसणाऱ्या पावसाचा जोर रविवारी जरा कमी झाला होता.

नाशिक : पालखेड, दारणा धरणातून विसर्ग

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, चार धरणांमधून विसर्ग केला जात आहे. दारणा, पालखेड आणि नांदुरमध्यमेश्वर धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मुकणे धरणही ५० टक्के भरले असल्याने धरणातून विसर्ग केला जात आहे. गंगापूर धरणाच्या पातळीवरदेखील लक्ष ठेवले जात असून, अवघ्या तीन दिवसांत जिल्ह्यातील पाणीसाठा ३७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
भारतातून वर्षभरात सव्वाचार कोटी टने कृषिमालाची निर्यात