पाऊस कायम: जोर मात्र कमी राहणार हवामान विभागाचा अंदाज | कोकण, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अॅलर्ट

Rain in maharashtra
photo: social media

पुणे : राज्यात सर्वदूर दमदार पाऊस पडत आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस कायम आहे. शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अॅलर्ट तर विदर्भात यलो अॅलर्ट असून जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांनंतर राज्यात पाऊस कायम राहणार असला तरी त्याचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मागील आठवडाभर राज्यावर कमी दाबाचा पट्टा कार्यरत असल्यामुळे सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांत अतिवृष्टी, मुसळधार पाऊस पडला. कोकण व मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टी होऊन नद्यानाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवार, १५ जुलैला पालघर, रायगड, कोल्हापूर, पुणे, साताऱ्यामध्ये ऑरेंज अॅलर्ट असून जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीमध्ये यलो अॅलर्ट हवामान विभागाने दिला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

नाशिकमध्ये पाचव्या दिवशीही संततधार
नाशिक जिल्ह्यात गेल्या सात-आठ दिवसांपासून सूर्यदर्शन दुर्लभ झाले असून, पाचव्या दिवशीही संततधार कायम असली तरी पावसाचा जोर मात्र काहीसा मंदावला आहे. जिल्ह्यातील पाच धरणे ओव्हरफ्लो झाली असून, गुरुवारीही धरणांमधून विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरीसह नद्या-नाले दुथडी भरूनच वाहत होते. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडली आहे.

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पूर्वार्धात मात्र मुसळधार आषाढ सरी कोसळत आहेत. गेल्या पाच दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठा ७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी हा साठा अवघा २८ टक्के होता. अवघ्या पाच दिवसांत तो ४५ टक्के वाढला आहे. विशेष म्हणजे, पाच धरणे ओव्हरफ्लो झाली असून, इतर धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ५३ हजार ८१५ क्युसेकचा विसर्ग केला जात असून, हे पूरपाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे. नाशिकचा पश्चिम पट्टा असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, तसेच सुरगाणा, पेठ, दिंडोरी या भागात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे गंगापूर, पालखेड, वाघाड, ओझरखेड, दारणा, मुकणे आदी धरणांच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

मराठवाड्यात जोर ओसरला
मान्सूनचा पाऊस राज्यात सर्वदूर दमदार कोसळू लागला आहे. मुसळधार पावसाने अनेक भागांत दाणादाण उडवून दिली. तथापि गुरुवारी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरला. औरंगाबाद जिल्ह्यात पाच दिवसांनंतर अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तसेच ढगाळ वातावरण कायम होते. राज्यात पावसाचा जोर कमी-अधिक असला तरी हिंगोली नांदेड वगळता औरंगाबादसह उर्वरित मराठवाड्यात जेमतेम स्वरूपाचा पाऊस आहे.
आणखी वाचा : मंत्रिमंडळ निर्णय: बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना मताधिकार