शेतकऱ्यांच्या ‘सरकी’चा व्यापारी ‘गेम’! तीन हजार रुपये प्रतिकिलोने खरेदी, बियाण्याला क्विंटलामागे दीड लाखांचा भाव

dhep
photo: marathi paper

कासोदा (एरंडोल): शेतकऱ्यांची सरकी तीन हजार रुपये क्विंटल विकली जात आहे, मात्र प्रक्रिया करुन जे सरकी बियाणे पेरणीसाठी मिळते ते तब्बल १ लाख ६० हजार रुपये क्विंटल विकले जात आहे, प्रक्रिया केली तरी हा फरक जमीन आस्मानी असून या किमतीवर सरकारचे असे कसे नियंत्रण आहे असा संताप शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.

हे दर कापसाच्याच बाबतीत नाही तर सर्वच पिकांच्या बाबत आहेत, यामुळे देश व राज्यातील कृषिमंत्र्यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

कापूस बियाणे ४५० ग्रॅम वजनाचे पाकीट बाजारात ८१० रुपयांना विकले जात आहे, ही किंमत क्विंटलमध्ये १,६०,००० रुपये एवढी मोठी होते, तर शेतकऱ्यांची सरकी तीन हजार रुपये क्विंटल विकली जाते आहे, शेतकऱ्यांचा मका दोन हजार ते एकवीसशे रुपये क्विंटल बाजारात विकला जात आहे, मात्र याचे बियाणे ४० हजार रुपये क्विंटल विकत घ्यावे लागत आहे. ४ किलोची बॅग १५००. १६०० रुपयाची मिळत आहे.

बियाण्याचे भाव व शेतकऱ्यांचा मालाच्या भावातील ही तफावत डोळे विस्फारणारी असून शासनाने या भल्या मोठ्या तफावतीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे. कंपनीच्या बियाण्यांचे दर एवढे भयावह आहेत तर जे बोगस बियाणे विकले जात आहे, त्याच्यात किती नफा होत असेल, याबाबत देखील जाणकारांतून चर्चा होताना दिसत आहे.

शेतमाल कवडीमोल

बाजारात तुरीचे भाव ५००० रुपये क्चिटल आहेत, मात्र बियाणे २५००० रुपये क्विटल विकत घ्यावे लागत आहे. उडीद व मूग देखील जवळपास याच दराने विकला जातो व बियाणे तुरीसारखे थोड्या फार फरकाने विकत घ्यावे लागत आहे. तर ज्वारीचे बियाणे १८००० रुपये क्विटल असून शेतकऱ्यांची ज्यारी मात्र १५०० रुपये क्विटल आहे. बाजरीचे बियाणे २२००० हजार रुपये क्विटल असून शेतकऱ्यांची बाजरी मात्र २२०० रुपये क्चिटल विकली जात आहे.
दिलासादायक: कांद्याची आवक वाढून भावातही वाढ