Homeताज्या बातम्यामाजी आमदारांच्या एकापेक्षा जास्त पेन्शनला पंजाब सरकारची कात्री; कितीही वेळा आमदार असले...

माजी आमदारांच्या एकापेक्षा जास्त पेन्शनला पंजाब सरकारची कात्री; कितीही वेळा आमदार असले तरी एकच पेन्शन: मुख्यमंत्री भगवंत मान

चंदीगड: पंजाबमध्ये कितीही वेळा आमदार म्हणून निवडून आले तरीही केवळ एकाच कार्यकाळासाठीच्या मासिक पेन्शनचा लाभ घेता येणार आहे. राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या आप सरकारने यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती शुक्रवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिली. एवढेच नव्हे, तर आमदारांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या पेन्शनच्या लाभांचीही फेरसमीक्षा केली जाईल. यातून वाचलेला कोट्यवधीचा निधी जनकल्याणासाठी वापरला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आमदारपदाचा कार्यकाळ संपलेल्या उमेदवारास प्रत्येक टर्मसाठी दरमहा ठरावीक रक्कम पेन्शन स्वरूपात दिली जाते; मात्र पंजाबमधील माजी आमदारांना यापुढे एकाच कार्यकाळासाठीच्या पेन्शनचा लाभ दिला जाईल; मग ती व्यक्ती दोन वेळा आमदार राहिलेली असो की पाच वेळा किंवा दहा वेळा, पेन्शन मात्र एकाच टर्मसाठीची मिळणार, असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्हिडीओ संदेशातून जाहीर केले. सद्यःस्थितीत खासदारपदावर पोहोचलेल्या अनेक व्यक्ती आजही आमदारांसाठीच्या पेन्शनचा लाभ घेत आहेत, ही बाबही मान यांनी आपल्या संदेशात नमूद केली.

सरकारच्या या निर्णयामुळे वाचलेला निधी जनकल्याणासाठी खर्च केला जाईल, असेही मान यांनी स्पष्ट केले. राजकीय नेते जनतेसमोर हात जोडून सेवेची संधी द्या, असे म्हणून मते मागतात; मात्र हेच नेते एक-दोन-तीन-चार वेळा आमदार राहिल्यानंतर किंवा पुढील निवडणूक हरल्यानंतरही दरमहा लाखो रुपयांच्या पेन्शनचा लाभ घेतात. काही माजी आमदारांना साडेतीन लाखांची पेन्शन मिळत आहे, तर काहींना साडेचार लाख किंवा सव्वापाच लाखांची पेन्शन मिळत आहे.

यामुळे सरकारी तिजोरीला कोट्यवधीचा भार सहन करावा लागत असल्याचे मान म्हणाले; मात्र आता या अतिरिक्त पेन्शनच्या लाभावर कात्री लावली जाईल, असे मान यांनी जाहीर केले. त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या कौटुंबिक पेन्शनलाही अशाच प्रकारे कात्री लावली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात आपण संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिलेले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनो, ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा! …तर कठोर निर्णय घ्यावा लागेल -उपमुख्यमंत्री

RELATED ARTICLES
- Advertisment -

Recent Post