मालेगाव : सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. कांद्याला सरासरी ९०० रुपये प्रति किंटल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. तालुक्यात यावर्षीदेखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती. उन्हाळ कांदा बियाणे टाकण्यापासूनच शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. कांदा लागवडीच्या काळात अवकाळी पाऊस झाल्याने रोपे खराब झाली.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तयार रोपे आणून कांदा लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यातच लागवडीसाठी मजूर टंचाई भासत असल्याने जास्तीचे पैसे मोजून व रात्रीचा दिवस करून शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. काही ठिकाणी कांदा लागवडीच्या वेळीच भारनियमन व रोहित्र दुरुस्तीच्या नावाखाली खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी देऊन कांद्याचे पीक वाचविताना कसरत करावी लागली. त्यातच ऐन कांदा काढणीच्या वेळी ढगाळ वातावरण व पुन्हा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला.
अशा असंख्य संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी कांदा पिकविला. असे असले तरी ढगाळ वातावरण व बेमोसमी पाऊस व ऐन कांदा पोषण प्रक्रिया वेळी विहिरीतील पाणी आटल्याने त्याचा परिणाम थेट कांदा उत्पादनावर झाला. जेथे एकरी सात ते आठ ट्रॉली कांदा निघत होता. तेथे फक्त चार ते पाच ट्रॉली कांदा निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
जे शेतकरी सधन आहेत, त्यांनी कांदा चाळ भरून ठेवल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पैसे नव्हते त्या शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी मित्र नातलग यांच्याकडून हातउसने कर्ज घेतले आहे. ते संबंधित मित्र व नातलग आता दिलेले पैसे परत मागत आहेत.
सध्या लग्नसराई सुरू असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विकण्याशिवाय गत्यंतर नाही. कांदा विकून आर्थिक गरजा भागविण्याच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांना बाजार भावातील घसरणीने अडचणीत आणले आहे.
तीन हजार रुपये हमीभावाची मागणी
खते, बियाणे व औषधांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, मजुरीचे वाढलेले दर, कांदा विक्रीसाठी बाजारात नेण्याचा वाहतूक खर्च याचा हिशेब केला तर आजच्या बाजारभावाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीही परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडून पडले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता शासनाने कांद्याला तीन हजार रुपये प्रतिक्विटल हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.
मुंगसे, उमराणे, नामपूरसह अन्य बाजार समित्यांमधील दर
उत्तम प्रतीचा ७०० ते ९०० रुपये
मध्यम प्रतीचा ६०० ते ८०० रुपये
गोलटी १५० ते ३०० रुपये
कांदा बाजारभाव 22/05/2022
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
सातारा | — | क्विंटल | 439 | 500 | 1100 | 800 |
राहता | — | क्विंटल | 2408 | 200 | 1000 | 750 |
पुणे- खडकी | लोकल | क्विंटल | 37 | 600 | 1000 | 800 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 16 | 700 | 1100 | 900 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 441 | 300 | 900 | 600 |
पारनेर | उन्हाळी | क्विंटल | 2224 | 100 | 1425 | 800 |