भाव घसरले: सोयाबीन, कापसाची आवक घटली; शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा…

Soybean and Cotton
photo: social media

हिंगोली : जवळा बाजार मागील आठ दिवसांपासून सोयाबीन, कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने जवळा बाजार येथील बाजारपेठेत आवक घटली आहे. सोयाबीनला ५ हजार ५०० तर कापसाला ९ हजार २०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. लागवड खर्च आणि घटलेल्या उत्पादनाचा विचार केल्यास सध्या शेतीमालाला मिळणारा भाव कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील बाजारपेठेत परिसरातील दहा ते बारा गावांतील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी आणतात. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतमालाची खरेदी सुरू असते. दोन आठवड्यापूर्वी सोयाबीनला ५ हजार ८०० रुपये भाव मिळत होता. मागील आठवड्याच्या तुलनेत आता मात्र भाव चांगले घसरले आहेत. त्यामुळे सोयाबीनची आवक बाजारपेठेत अल्प प्रमाणात होत आहे. तर कापसाचे भाव सुरुवातीला ८ हजार ५०० ते ९ हजार २०० रूपये होते. या भावातही १०० ते २०० रूपयांचा चढउतार सुरू आहे. दोन्ही मालाचे भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन, कापूस विक्रीविना ठेवले आहे.

शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा…
गत आठवड्याच्या तुलनेत जवळा बाजार येथील बाजारपेठेत सोयाबीनसह कापसाची आवक मंदावली आहे. भाव कमी झाल्यामुळे शेतकरी माल विक्रीला आणत नसल्याचे चित्र आहे. सोयाबीनला किमान ६ ते ७ हजार दरम्यान तर कापसाला किमान १० हजार रुपये प्रति भाव मिळण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

मोंढ्यात एक हजार क्विंटल सोयाबीनची आवक
हिंगोली येथील मोंढ्यात शनिवारी एक हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. या सोयाबीनला सरासरी ५ हजार २१० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मागील आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात घसरण सुरू आहे. त्यामुळे येथील मोंढ्यात आवक मंदावली आहे. पंधरवड्यापूर्वी काही दिवस दररोज दोन हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत होते. आता मात्र भाव कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री थांबविली आहे. हे शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

मात्र त्यात वाढ होत नसल्याने चिंता वाढली आहे. ३ नोव्हेंबर रोजी मोंढ्यात १ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली. ४ हजार ९०० ते ५ हजार ५२१ रुपये प्रतिक्विंटल सोयाबीनला दर मिळाला, तर ५० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. सरासरी ४ हजार १५० रुपये प्रतिक्विंटल भावात मिळाला.
हे पण वाचा : Onion Rate : सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा