Homeताज्या बातम्याअवकाळीची कांदा उत्पादकाला धास्ती! माल झाकण्यासाठी प्लॅस्टिक कागदाचे झाकण

अवकाळीची कांदा उत्पादकाला धास्ती! माल झाकण्यासाठी प्लॅस्टिक कागदाचे झाकण

पुणे : यावर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली होती. तसेच कांद्याची काढणीही आता पूर्ण होत आलेली आहे; परंतु बाजारभाव कोलमडल्याने शेतकऱ्यांवर नैराश्याची वेळ आली आहे. त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांचा वांधा केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

मागील दोन वर्षांत कोरोनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न घटले होते. त्यामुळे यावर्षी कांद्याचा चांगला मोबदला भेटेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने, त्यात सध्या अवकाळी पावसाच्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिणामी, ऊन व पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातील कांद्याचा कांदाचाळीत साठवण करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

रबी हंगामात कांद्याच्या लागवडी उशिरा झाल्याने यावर्षी मे महिना सुरू झला तरी शेतकऱ्यांच्या कांदा काढणीचा हंगाम अद्याप अंतिम टप्प्यात आहे. मात्र, कांद्याचे बाजारभाव कोसळलेले असल्याने, कांदा साठवणुकीशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. त्यासाठी दगडी कांदा चाळ, लाकडी कांदा चाळ, लोखंडी कांदा चाळ, अशा पर्यायांचा विचार करावा लागत आहे. मात्र, शेतमजुरीत झालेली वाढ, खते, डिझेल आणि लोखंडाच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकऱ्यांना या पर्यायासाठी नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

वातावरणात झालेल्या बदलाने शेतकरी हवालदिल झाला आहे. वारा सुटून आकाशात ढग दिसू लागले आहेत. त्यामुळे पावसाच्या शक्यतेने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतात नुकताच काढून ठेवलेला कांदा झाकून ठेवला आहे.

मागील दोन महिन्यांपासून

वातावरणातील बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यावेळी प्रथमच कडक उन्हामुळे सर्व जण त्रस्त झाले आहेत. त्याचा परिणाम शेतीच्या कामावर व पिकांवर झाला आहे. मागील दोन दिवसांपासून पुन्हा वातावरणात अचानक बदल झाला आहे. पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. दोन दिवसांपासून आकाशात ढग दिसू लागले आहेत.

एकीकडे वातावरणात उष्णता असतानाही अनेकदा सूर्य मात्र ढगांच्या आड गेलेला दिसतो. पाऊस पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच कधीकधी जोरदार वारे वाहू लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. अवकाळी पाऊस झाल्यास त्याचा फटका पिकांना बसू नये यासाठी शेतकरी काळजी घेऊ लागला आहे. या हंगामातील कांदा काढणी वेगाने सुरू आहे.

मजुरांच्या साह्याने कांदा काढणी करून तो शेतात साठविला जात आहे. शिवाय कांद्याला अपेक्षित बाजारभाव नसल्याने तो साठवून ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र पावसाचे वातावरण होत असल्याने शेतकरी प्लॅस्टिकच्या कागदाने कांद्याची अरण झाकून ठेवत आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन टाकून कांदा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत वातावरणात बदल होत राहील, तोपर्यंत शेतकऱ्यांना कांद्याची काळजी घ्यावी लागणार आहे. बदलत्या वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढवली आहे.

खते, औषधे, मशागत, मजुरी, खताचा तुटवडा यासारख्या अनेक अडचणीवर मात करून वातावरणातील बदलामुळे कांदा पिकांवर होणारा परिणाम व त्याच्या औषध फवारणीसाठी करावा लागलेला भरसाठ खर्च सद्यःस्थितीत बाजारभावाने निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. रोगराई, औषधे, फवारणी, मजुरांची टवाई, खतांचा तुटवडा यासारख्या अनेक समस्यांवर मात करीत चार महिने जिवापाड जपला. साठवलेल्या कांद्याचे करायचे काय? हा प्रश्न आमच्यासमोर आहे. कांद्याचे बेभरवशाचे धोरण नेहमीच शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. – दीपक निगडे, शेतकरी, कर्नलवाडी

‘आम्ही यापूर्वी डाळिंब बागवतदार होतो. लहरी हवामानाचा फटका दर वर्षीच बागांना सलग बसत गेला. त्यामुळे डाळिबाची बाग मोडीत काढली. आता चार पैसे हातात पडतील या आशेने कांद्याची लागवड केली; पण कांदा काढणीची वेळ आली आणि बाजरभाव कोलमडले. नियमित कांदा उत्पादक नसल्याने साठवण्यासाठी पर्यायच नाही. अखेर चुलत बंधूचे मोकळे पोल्ट्रीचे शेड घेतले आणि त्या शेडमध्ये आता कांदा साठवणूक करीत आहे. – विराज निगडे, शेतकरी.
कापूस, सोयाबीन उत्पादन वाढीसाठी सरकारची विशेष योजना

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post