परीक्षेच्या हॉलतिकिटावर चक्क मोदी अन् धोनीचा फोटो! बिहारमध्ये बीए तृतीय वर्षाच्या परीक्षेतील प्रकार

Photo of Modi and Dhoni
Image Credit Source: Social Media

पाटणा : बिहारच्या एका विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जारी केलेल्या हॉलतिकिटावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल फागू चौहान आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचे छायाचित्र छापून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांच्या खोडसाळपणामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात असून, या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सोशल माध्यमातून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यापीठाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

बी.ए. तृतीय वर्षातील काही विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना आपल्या छायाचित्राऐवजी पंतप्रधान, राज्यपाल व धोनीचे छायाचित्र अपलोड केले. त्यामुळे हॉलतिकिटावरदेखील तेच छायाचित्र छापून आले. या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, तर या प्रकरणात गुन्हादेखील दाखल केला जाऊ शकतो, असे ललित नारायण मिथिला विद्यापीठातील अधिकारी मुश्ताक अहमद यांनी सांगितले. मधुबनी, समस्तीपूर आणि बेगूसराय जिल्ह्यांमध्ये स्थित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी हा खोडसाळपणा केल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेमुळे विद्यापीठाची बदनामी झाली असून, चौकशीनंतर कठोर कारवाई केली जाईल. पंतप्रधान व राज्यपालांच्या छायाचित्रांचा दुरुपयोग ही बाबदेखील गंभीर असल्याचे अहमद म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी मुजफ्फरपूरमध्येदेखील असा प्रकार घडला होता. एका विद्यार्थ्याच्या हॉलतिकिटवर वडील व आईच्या नावाऐवजी बॉलीवूड अभिनेता इम्रान हाश्मी व अभिनेत्री सनी लियोनीचे नाव छापून आले होते.