नाशिक : नाफेडची कांदा खरेदी ही सरासरी पेक्षा कमी दराने होत आहे. फेडरेशन व फार्मर प्रोड्युसर कंपन्यांऐवजी नाफेडने स्वतः खरेदी करावी. उत्पादन खर्च पाहता किमान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करावा, अशी मागणी उचलून धरत कांदा उत्पादक संघटनेचे भारत दिघोळे, कुबेर जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पिंपळगावच्या नाफेड कार्यालयावर धडक दिली. उत्पादन खचपिक्षा कमीदराने व संशयास्पद खरेदीच्या मुद्द्यावरून शिष्टमंडळाने नाफेडचे पिंपळगाव विभागाचे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांना घेराव घातला. दरासह कांद्याच्या विविध विषयावरून प्रश्नांची सरबत्ती केली.
सध्या उन्हाळ कांद्याची बंपर आवक नाशिक जिल्ह्यात सुरू आहे. कोसळलेल्या दराला टेकू देण्यासाठी नाफेडने सव्वा दोन लाख टन कांदा खरेदीची घोषणा केली आहे. तशी सुरूवात केली, पण तो फार्स असल्याचे स्पष्ट होत आहे. नाफेडने कांदा खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात अकरा फेडरेशनची नियुक्ती केली. नाफेडने फेडरेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या या खरेदीत काळेबेरे असल्याचा आरोप करीत कांदा उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपळगाव गाठले. नाफेड कार्यालयात कांद्याच्या मुद्द्यावरून व्यवस्थापक शैलेद्र कुमार यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली.
खते, औषधे, इंधनाच्या दरासह महागाई वाढलेली असताना कांद्याचे दर का वाढत नाही, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी केला. शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेणे बंद केले तर २०० रूपये किलोने कांदा खरेदी करावा लागेल. दोन वर्षापासून केंद्र शासनाने परदेशातून ५५ रूपये किलोने कांदा आयात केला. तोच दर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात काय अडसर काय, अशा प्रश्नांची तोफ शिष्टमंडळाने डागली. पिंपळगांव बाजार समितीतून आज अवघी दोनशे क्विंटल कांदा खरेदी करून नौटंकी केली. तेही सरासरीपेक्षा कमी दराने खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी जयदीप भदाणे, शेखर कापडणीस, तुषार खैरनार, हर्षल आहिरे, भगवान जाधव, किरण मोरे, सुभाष शिंदे, पंकज बोरसे आदी उपस्थित होते.
काही काळ तणावाची स्थिती
कांदा तीन हजार रूपये प्रतिकिलोने खरेदी न केल्यास नाफेडची कांदा खरेदी बंद करण्याचा इशारा देण्यात आला. कांद्याच्या दरात सुधारणा न झाल्यास दिल्लीला धडक देण्याचा निर्धार शिष्टमंडळाने केला. नाफेडचे व्यवस्थापक शैलेद्र कुमार यांनी शिष्टमंडळाला समाधानकारक उत्तर न दिल्याने परिस्थिती तणावाची बनली.
अल्प दरात कांदा खरेदी करून नाफेड व व्यापारी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेत आहे. नाफेडकडून खरेदीचा फक्त देखावा सुरू आहे. नाफेडची ही कांदा खरेदी संशयास्प असूनं कुठेतरी पाणी मुरते आहे. काळ्या यादीतील फेडरेशनला नाफेडकडून अधिकची कांदा खरेदी करण्यास सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा कांदा ३० रूपये किलोने नाफेडने खरेदी करावा अशी आमची मागणी आहे. – भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना.
४५ गुंठे जमिनीत कलिंगडाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न! ७५ दिवसांमध्ये कमावले ३ राख रुपये