पाऊस पडेना, खताची गोणी मिळेना; बळीराजा म्हणतोये यंदा आमचं नॉट ओके..

farmer
Photo: Social media

बीड: जून महिना संपत आला पण अद्यापही पुरेसा पाऊस पडला नाही. खरीप परेणी रखडली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मुके प्राणी चारा, पाण्यासाठी हंबरडा फोडत आहेत. त्यातच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थीर झाले असून शेतकऱ्यांना आवश्यक ते रासायनिक खत मिळणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून शासनाने पुरसे खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे..

कृषी सेवा केंद्राचे दुकानात शेतकऱ्यांना खताची गोणी मिळेनाशी झाली आहे. शेतकरी वर्गाकडून डीएपी खताला मोठी मागणी आहे. मात्र हे खत बाजारात मिळेनासे झाले आहे. कृषी विभागाकडून युक्रेनच्या युद्धाचा फटका खत कंपन्यांना बसला आहे. कच्चामाल बाहेर देशातून येत असल्यामुळे युद्धाचा परिणाम झाल्यामुळे खताची टंचाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे. युद्धाच्या काळात सर्व काही मिळते परंतु शेतकऱ्यांचा फक्त खत मिळत नाही का ? असा सवाल शेतकऱ्यातून उपस्थित होत आहे. महाराष्ट्र व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर खत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

शेतकऱ्यांनी उधारी, उसनवारी व प्रसंगी टक्केवारी करून खरीप पेरणीपूर्व तयारी केली आहे. त्यातच मृग नक्षत्र कोरडे गेले, जून महिना संपत आला तरी पाऊस येत नसल्याने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाने पाठ फिरवली असतानाच सोयाबीनची पिशवी मागील वर्षीच्या तुलनेत हजार रुपये जादा दराने मिळत आहे. महागाईचा फटका शेतकऱ्यांना जास्त बसत आहे. मागील वर्षी १४५० रुपयाला मिळणारा डीएपी आज बाजारात १८०० ते २००० रुपयापर्यंत वाढला आहे. राज्यातील सत्ताधारी व विरोधक सत्तेच्या खुर्चीसाठी संघर्ष करीत आहेत.
दिलासादायक: कांद्याची आवक वाढून भावातही वाढ