यंदा देशात मान्सून सामान्य, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक! स्कायमेटचा दिलासादायक अंदाज

rain

नवी दिल्ली: हवामानाची माहिती देणारी खासगी संस्था ‘स्कायमेट’ नुसार देशात यंदा सामान्य मान्सून राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा या कृषी क्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचे दिलासादायक भाकीत स्कायमेटने वर्तवले आहे.

देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी ८८० मिमी पाऊस पडतो. यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असा स्काटमेंटचा अंदाज आहे. यामध्ये पाच टक्के कमी-अधिक होऊ शकते. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सामान्य मानला जातो. म्हणजेच स्काटमेटच्या अंदाजानुसार यंदा सामान्य पाऊस पडेल. पश्चिमेकडील राजस्थान आणि गुजरातसह ईशान्येकडील नागालँड, मिझोरम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये सामान्यापेक्षा कमी पावसाचा धोका असल्याचे स्काटमेटने म्हटले आहे.

याशिवाय केरळ आणि कर्नाटकात जुलै व ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडेल. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सामान्यापेक्षा अधिक पाऊस पडेल, असा स्काटमेटचा अंदाज आहे. यंदा मान्सूची सुरुवात चांगली असेल. पावसाळ्याच्या पूर्वार्धात म्हणजे जून-जुलै महिन्यात उत्तराधपिक्षा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या भारतातील अद्यापही मोठे कृषी क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

मान्सूनचे आगमन होताच शेतकरी पेरणी करतात. मात्र त्यानंतर वरुणराजा दडी मारत असल्यामुळे पेरणी वाया जाते. त्यामुळे पेरणीच्या कालावधीतच दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज बळीराजासाठी दिलासादायक म्हणता येईल. हवामानातील अल निनो घटनेमुळे मान्सून घटतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून चांगल्या पावसासाठी अनुकूल असलेली ला निना स्थिती निर्माण होत असल्याचे स्कायमेटचे सीईओ योगेश पाटील यांनी सांगितले.

नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना ला नीना स्थिती अजून प्रबळ होणार असल्याने मान्सूनची सुरुवात चांगली असेल, असे पाटील यांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत भारतीय हवामान विभागाकडून मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात येईल.
जळगावात केळी घड कापून फेकण्याचे सत्र सुरूच! पोलिसांसमोर पुन्हा आव्हान