जागतिक आरोग्य संघटनेची आपत्कालीन बैठक: मंकीपॉक्सने माजवली खळबळ, १२ देशांमध्ये शिरकाव

Monkeypox
Photo: Social media

नवी दिल्ली : कोरोनानंतर आता जगात मंकीपॉक्स नामक आजाराने खळबळ माजली आहे. महिनाभरात अमेरिकेसह १२ देशांमध्ये या आजाराचे ८० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचे अजून रुग्ण समोर येण्याची शक्यता वर्तवली असून, या आजारावर चर्चा करण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

स्मॉलपॉक्स म्हणजेच देवीरोगसदृश असलेला मंकीपॉक्स हा आजार आतापर्यंत प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये आढळत होता. मात्र, गेल्या काही दिवसांत युरोपियन देशांमध्ये या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळू लागल्याने चिंता वाढली आहे. स्पेनमध्ये या आजाराचे सर्वाधिक ३० रुग्ण आढळले आहेत. याशिवाय ब्रिटन, पोर्तुगाल, जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स, नेदरलँड, इटली, स्वीडन या युरोपियन देशांसह अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया अशा एकूण १२ देशांमध्ये मंकीपॉक्सच्या ८० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ब्रिटनमध्ये ७ मे ते २० दरम्यान २० रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी सांगितले.

भारत सरकार सतर्क
परदेशात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकारदेखील सतर्क झाले. सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदरांवर संशयितांची तपासणी सुरू केली आहे. प्रामुख्याने आफ्रिकन राष्ट्रांमधून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात येत असून, संशयितांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय ५० संशयित रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी सुरू आहे. युरोपियन देशांमधील सध्याची रुग्णसंख्या ही केवळ हिमनगाचे टोक असून, येत्या काही दिवसांत या आजाराचे शेकडो रुग्ण आढळू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंकीपॉक्सवर कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. देवीरोग आणि मंकीपॉक्सची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे देवीच्या रोगावरील लस मंकीपॉक्सवर ८५ टक्के परिणामकारक असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आफ्रिकन देशांमध्ये आढळणारा हा आजार अचानक युरोपियन देशांमध्ये पसरणे हे आमच्या दृष्टीने सर्वात मोठे चिंतेचे कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने युरोप आणि इतर देशांमधील आरोग्य संघटनांची एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे.