नवी दिल्ली : लहान व्यापाऱ्यांना लवकरच किसान क्रेडिट कार्डसारखे व्यापार क्रेडिट कार्ड मिळू शकते. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत व्यापार क्रेडिट कार्ड देण्याची मागणी केली होती. ही सूचना अर्थ मंत्रालयाच्या स्थायी समितीने स्वीकारली आहे. त्यामुळे लवकरच एमएसएमईच्या नोंदणीकृत उद्योजक आणि व्यापाऱ्यांना व्यापार क्रेडिट कार्ड देण्यात येण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापार कार्डला एका मर्यादेत न ठेवता कोणतीही वस्तू गहाण न ठेवता कर्ज देण्याची शिफारस करण्यात आली आहे. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांकडे पैसा सतत खेळता राहावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या एमएसएमईचा आकार कृषी क्षेत्रासारखा मोठा होत आहे. किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने शेतकरी बियाणे विकत घेण्यास कमी व दिर्घ काळासाठी ज्याप्रमाणे कर्ज घेतात त्याचप्रकारे व्यापाऱ्यांनाही व्यापार क्रेडिट कार्डचा वापर करता येणार आहे.
यांना मिळणार व्यापार क्रेडिट कार्ड
एमएसएमई मंत्रालयाच्या उद्यम पोर्टलवर नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांनाच व्यापार क्रेडिट कार्ड देण्यात यावे यासाठी समितीने शिफारस केली आहे. असे कोट्यवधी व्यापारी आहेत ज्यांनी पोर्टलवर आपली नोंदणी केलेली नाही.
व्यापार क्रेडिट कार्ड आणल्यामुळे नोंदणी न केलेलेही उद्योजक पोर्टलशी जोडले जातील. व्यापार क्रेडिट कार्डमुळे रस्त्याच्या बाजुला व्यवसाय करणारे व्यापारी, किराणा दुकानदार, गाव आणि शहरातील अनेक दुकानदारांना मोठा फायदा होणार आहे.
व्यापार क्रेडिट कार्डला राष्ट्रीय स्तरावर लाँच केले जाण्याची शक्यता असून, व्यापार क्रेडिट कार्डसाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक (सिडबी) नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या स्थायी समितीने याबाबत अर्थ मंत्रालय व विविध बँकांशी चर्चाही केली आहे.
….तर एकसमानता येईल, सर्वांना लाभ मिळेल
काही बँका आपल्या आपल्या स्तरावर व्यापाऱ्यांना क्रेडिट कार्ड देतात. मात्र यामुळे केवळ काही ठराविकच व्यापाऱ्यांनाच फायदा मिळतो. समितीने केलेल्या शिफारसीनुसार, सरकारला देशातील प्रमुख बँकांशी चर्चा करून राष्ट्रीय स्तरावर व्यापार क्रेडिट कार्ड सादर करण्याची गरज आहे. यामुळे कार्डमध्ये एकसमानता आणि सर्वांना लाभ मिळेल.
खते, औषधांच्या किमतीत वाढ! शेतकरी चिंतेत; दरवाढीवर नियंत्रण आवश्यक