मुंबई: आम्हीही अयोध्येत जाऊन महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी कार्यालय उभारणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाच केलेली आहे. याशिवाय आम्हीही कार्यालय लखनौला करू, वाराणसीला करू. हा सरकार टू सरकारचा प्रश्न आहे. असे मुंबईत कार्यालय सुरू करण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेला खा. संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईत कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. तेव्हापासून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत याबाबत प्रतिक्रिया देताना बुधवारी म्हणाले की, मला वाटते, मुंबई, नवी मुंबईत अनेक राज्यांची कार्यालये आहेत. यामुळे आणखी कोण कोणत्या जागेवर कार्यालय उभारणार, हा प्रश्न नाही. देश एक आहे असे आपण म्हणतो, येऊ शकतो.
आम्हीही अयोध्येत जाऊन महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी एक सेंटर उभे करणार आहोत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून यापूर्वीच घोषणा केली आहे. याशिवाय आम्हीही कार्यालय लखनौला करू, वाराणसीला करू. हा सरकार टू सरकारचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ले द्यावेत, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अगदी बरोबर ! नरेंद्र मोदींनीसुद्धा सांगितले आहे की, शरद पवार त्यांचे गुरू आहेत, त्यांचा ते सल्ला घेतात, सल्ल्यानुसार काम करतात. शरद पवार मुख्यमंत्रीच नव्हे, तर देशातल्या अनेक प्रमुख नेत्यांना सल्ले देतात. राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रातला त्यांचा अनुभव दांडगा आहे. अनेक पत्रे मुख्यमंत्र्यांना रोज येत असतात, त्यात काही नवीन नाही, असे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्राबाबत राऊत यांनी म्हटले आहे.
केंद्रीय यंत्रणांकडून चौकशीची मागणी
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये ५६०० कोटी रुपयांचा घोटाळा २०१३ मध्ये उघडकीस आला होता. यामध्ये तब्बल १३ हजार गुंतवणूकदारांचे पैसे अडकले होते. या घोटाळ्यात ज्या कंपनीची चौकशी झाली त्याच कंपनीकडून भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्यांना लाखो रुपये मिळाल्याची माहिती आहे, असा आरोप करून संजय राऊत यांनी याबाबत केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
– अतिरिक्त उसाने घेतला शेतकऱ्याचा बळी! दोन एकर उसाला काडी लावून कवटाळले मरण