राज्यात सर्वत्र कोसळधार: पिकांचे नुकसान, शेतकरी संकटात; पुढील चार दिवस जोरदार पाऊस

rain
फोटो: सोशल मिडिया

मुंबई : राज्यात मंगळवारी विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यंतरी काहीशा विश्रांतीनंतर पावसास पुन्हा सुरुवात झाल्याने राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह उपनगर आणि महानगर क्षेत्रातही सोमवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. ठिकठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या, तर महामार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.

भंडारा जिल्ह्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरले. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. ३३ दरवाजातून विसर्ग सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांना मोठा फटका बसला आहे. संततधारेने गोदावरी, आसना, मांजरा, पैनगंगा, मन्याड या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. विष्णुपुरी प्रकल्प ७४ टक्के भरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ९५ टक्के भरले आहे. पंचगंगा नदीची पातळी ३७ फुटांवर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला आहे.

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना धरणाचे दरवाजेही उघडण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात कपाशी, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वाधिक १२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला. पुराच्या पाण्याने सोनवडेतर्फे कळसुली-नरवडे जोडणारा लोखंडी साकव वाहून गेला. पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात ठिकठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. चांदोली धरणाचे चार वक्राकार दरवाजे उचलून सांडव्यातून १३००, तर विद्युत निर्मितीतून १७०० असे एकूण ३००० क्युसेक्सने वारणा नदीत पाणी सोडले जात आहे. सोलापूर जिल्ह्यात पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील छोट्या नद्या, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत.

पुढील चार दिवस जोरदार पाऊस
आगामी चार दिवस राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून अरबी समुद्रावरून पश्चिमी वाऱ्यांचा वेग कायम आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. येत्या १० ते १४ ऑगस्टदरम्यान कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
आणखी वाचा : Banana Price: केळी उत्पादक शेतकऱ्यांनसाठी आनंदाची बातमी! विक्रमी भावाने नुकसान भरून काढले