नागपूर : पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत खंडाळा (ता. मौदा) येथील शेतकऱ्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत केळीची बाग फुलवली आहे. आनंदकिशोर येरल्लागड्डा असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी आपल्या १० एकर शेतात केळीची बाग तयार केली आहे. सोबतच त्यांनी १० एकरांत मिरची व पाच एकरात वांगी या भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत येरल्लागड्डा यांनी फुलवलेली शेती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणावाट ठरत आहे.
मौदा तालुका धान उत्पादक म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील बहुतांश शेतकरी धान, कपाशी, तूर आदी पारंपरिक पिके घेतात. तर काही शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळले असून, मिरची, वांगी, टोमॅटो आदी पिके घेत आहेत. खंडाळा येथील शेतकरी आनंदकिशोर येरल्लागड्डा यांनी मिरची, वांगी या भाजीपाला पिकांसह १० एकरांत केळीची लागवड केली आहे. ही शेती करणे सोपे नाही म्हणून त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी यानमार कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी केले. संपूर्ण देशात हे ट्रॅक्टर येरल्लागड्डा यांनी घेतले आहे. यानमार जपान कंपनीचे असलेले हे ट्रॅक्टर पाहण्यासाठी गावातील नागरिक तसेच जपान येथील काही मॅनेजमेंट अधिकाऱ्यांनी नुकतीच त्यांच्या शेतीत भेट दिली.
आनंदकिशोर येरल्लागड्डा यांचा जपानच्या पाहुण्यांनी सत्कार केला. यावेळी सोलीस यानमार कंपनीकडून त्यांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्पादन प्रमुख धीरज शर्मा, मार्केटिंग प्रमुख वर्मा, जपान येथील अधिकारी तत्सूया नकानिशी सान, मासाकाझू कोमात्सू सान, केशवमूर्ती सान, राधेश्याम पटले, क्षेत्र विक्री व्यवस्थापक प्रकाश वाघे, श्रीकांत किरपान, वनिता किरपान, अंकुश भाकरे, सुनील निमकर, सिन्नू यांगट्टी, ग्रामपंचायत सदस्य लता छुरा, चारुदत्त किरपान, हरिभाऊ कोंगे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
शेती करण्याची मनापासून आवड आहे; परंतु रासायनिक खते, कीटकनाशकाच्या किमतीत वाढ झाल्याने आता धान शेती करणे कठीण झाले आहे. त्यामुळे कमी खर्चात १० एकरांत ठिबक पद्धतीने केळीची लागवड केली आहे. आज केळीच्या एका झाडाला ५०० च्या आसपास फळधारणा झाली आहे. केळी बागेच्या विश्वासावर देशात नसलेला एकमेव यानमार कंपनीचा ट्रॅक्टर घेतला आहे. -आनंदकिशोर येरल्लागड्डा, शेतकरी, खंडाळा, ता. मौदा.
ज्या पिकासाठी कर्ज घेतले; तेच वाण पेरा! प्रशासनाचा शेतकऱ्यानं इशारा