पुणे : जांभळाची शेती काही ठिकाणी केली जाते. मात्र, तिचे प्रमाण हे खूपच नगण्य असते. दौंड तालुक्यातील राहू गावचे शेतकरी बाळासाहेब शंकर भुजबळ यांनी सात वर्षांपूर्वी जांभळाची शेतात लागवड करून उत्तम निगा राखत उत्पादन घेण्यास सुरुवात केली असून त्यांनी राबविलेल्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काही वर्षांपूर्वी जंगलात अथवा एखाद्याच्या शेतात जांभळाचे झाड असायचे, त्याला लगडलेली जांभळे तोडायची आणि एकत्रित जमून आनंदाने खायली जायची. तसेच जंगलातील झाडाची जांभळे तोडून त्याची विक्री केली जायची. जांभळाचे झाड हे शेताच्या बांधावर अथवा शेतात असते.
एकापेक्षा जास्त झाडे असतील आणि जास्त प्रमाणात फळे लागल्यास ती झाडे विक्रेत्यांना विकली जायची. यातून काही प्रमाणात पैसे मिळायचे. मात्र, ते उत्पन्न शेतकऱ्यांचा मुख्य स्रोत नसायचे. मात्र, अलीकडील काही वर्षांमध्ये काही शेतकऱ्यांनी जांभळाकडे शाश्वत उत्पन्न देणारे झाड म्हणून पाहिले आहे.
बाळासाहेब भुजबळ हे नोकरी करायचे. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष देऊ लागले. त्यांनी स्वतःच्या शेतात विविध प्रयोग केले आहेत, त्यामुळे ते प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात.
२०१५ साली अडीच एकर क्षेत्रात भुजबळ यांनी कृष्णागिरी जातीच्या जांभळाची २५० झाडांची लागवड केली आहे. लागवड करून तब्बल सात वर्षे झाली आहेत. त्यांना आतापर्यंत जांभळाचे ४ ते ५ हंगाम सापडले आहेत. भुजबळ उत्पादित करत असलेले जांभूळ हे उच्चप्रतीचे असल्याने त्यांना प्रति किलोला २०० ते २५० रुपये भाव मिळतो. जांभळाच्या झाडांच्या वाढीसाठी तसेच निगा राखण्यासाठी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीचा वापर केला.
सद्यःस्थितीत लोक आयुर्वेदाकडे वळत आहेत आणि आयुर्वेदामध्ये जांभळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जांभूळ हे मधुमेहाचा आजार असणाऱ्यांसाठी वरदान मानले जाते. गेल्या काही वर्षांपासून मधुमेही रुग्ण जांभळाचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात हीच गरज लक्षात घेऊन आणि शेती करता-करता मधुमेही रुग्णांसाठी जांभळाची गरज भागविण्याच्या हेतूने जांभळाची शेती करण्याचा निर्णय घेतल्याचे बाळासाहेब भुजबळ हे आवर्जून नमूद करतात.
कर्नाटक राज्यातून जांभळाची रोपे भुजबळ यांनी आणली. जांभळाच्या शेतीला कमी प्रमाणात खर्च येतो. एकरी मशागतीसह इतर खर्च २५ हजार रुपये येतो. एकरी चार ते पाच लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. तर, अडीच एकर शेतीतून तब्बल ८ ते ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
जांभळाचा हंगाम सुरू झाल्यानंतर दोन दिवसांतून एकदा तोडणी केली जाते. आकर्षक बॉक्समध्ये जांभळाचे पॅकिंग करून मार्केटयार्डात विक्री केली जाते. यासाठी माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांची मोलाची मदत आणि ‘मार्गदर्शन होत असल्याचा उल्लेख भुजबळ आवर्जून करतात.
भुजबळ हे १९८४-८५ सालापासून शेती करतात. सुरुवातीला त्यांनी राहू परिसरात डाळिंबाचे उत्पादन घेतले होते. त्यावेळी डाळिंबाचे उत्पादन घेणारे त्या परिसरातील पहिले शेतकरी ठरले आहेत. सद्यःस्थितीत सध्या अनेक शेतकरी डाळिंबाचे उत्पादन घेत आहेत. त्याचपद्धतीने जांभळाचे उत्पादन घेणारेही राहू परिसरातील पहिले शेतकरी होण्याचा मान भुजबळ यांना मिळाला आहे.
जांभळाच्या शेतीबाबत परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. काही शेतकरी जांभळाचे उत्पादन घेण्यासाठी त्यांचे मार्गदर्शनही घेत आहेत. आगामी काळात राहू परिसरात जांभूळ शेतीचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल. दरम्यान, येत्या काही वर्षांतच जांभूळ निर्यात करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतीत बाळासाहेब भुजबळ, त्यांच्या पत्नी दोघेच लक्ष देतात. त्यांची योगेश, गणेश आणि दिनेश ही तीनही मुले नोकरी तसेच व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतात.
जांभूळ हे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते. तसेच त्यातून चांगले उत्पन्न मिळते. रुग्णांची सेवा आणि उत्पन्नाचा मार्ग हे दोन्ही हेतू जांभूळ शेतीतून साध्य होत असल्यामुळे जांभूळ शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात अजूनही शेतीत वेगवेगळे प्रयोग करणार आहे. – बाळासाहेब शंकर भुजबळ, शेतकरी, राहू, ता. दौंड.
पावसाच्या हजेरीने बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी