भातावर करप्याचा प्रादुर्भाव; शेतकरी हवालदिल

Infecting rice
Image Credit Source: Social Media

शिराळा : तालुक्यात भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी भात पिके जोमात आली आहेत, मात्र करण्याने डोके वर काढल्याने उत्पन्न घटण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतात पाणी साचले असून पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील मुख्य पीक भात असून क्षेत्र १२ हजार ८७४ हेक्टर आहे.

धूळवाफेत पेरणी करण्यात आली असून भात उगवण चांगली झाली आहे. सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग पिकांची वाढ खुंटली आहे. चांदोली धरण शंभर टक्के भरले आहे. ३४.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तालुक्यात गेल्या पाच सहा दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे त्यामुळे पीक काढणीला सुरुवात झाली आहे. आरळा- शित्तुर, चरण- सोंडोली, कांदे-मांगले, बिळाशी-भेडसगाव हे पूल मध्यंतरी पाण्याखाली गेले होते, आता ते वाहतुकीस खुले झाले आहेत.