एक कोटीच्या विम्यासाठी पत्नीने सुपारी देत पतीची केली हत्या; अपघात दाखविण्याचा प्रयत्न फसला

murder
फोटो: iPleaders Blog

बीड : मोठ्या रकमेची विमा पॉलिसी काढलेल्या पतीच्या खूनाची सुपारी देमाऱ्या पत्नीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. तिच्यासह अन्य दोघांना अटक केली असून, सुपारी घेवून खून करणारे दोघे मात्र, अद्याप फरार आहेत. एका व्यक्तीचा अपघाताने मृत्यू झाल्याचा प्रकार दि. ११ रोजी समोर आला होता, परंतु अपघात नसून खून असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तर, चक्क पत्नीनेच पतीची सुपारी देऊन हत्या घडविल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मंचक पवार असे खून झालेल्याते नाव आहे. मंचक पवार हा गत काही वर्षांपासून बीड येथेच राहत होता. त्याला सासरची काही शेतजमीन देखील मिळाली होती. शनिवार दि. ११ रोजी पिंपरगव्हाण शिवारात म्हसोबा फाट्याजवळ एका व्यक्तीचे प्रेत मिळाल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार तपास सुरु करण्यात आला. घटनास्थळी एक विना क्रमाकांची दुचाकी आढळून आली. यावेळी पवार याच्या डोक्याला मार लागल्याचे दिसून येत होते. प्रथमदर्शनी हा अपघात वाटत असला तरी पोलिसांना संशय आल्याने अधिक तपास केला असता हा मृतदेह मंचक गोविंद पवार याचा असल्याचे समोर आले. या प्रकरणात त्याची पत्नी व मुलाकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यानंतर पथकाने श्रीकृष्ण सखाराम बागलाने याला ताब्यात घेवून चौकशी करताच मंचक पवार याचा खून गंगाबाई मंचक पवार हिच्या सांगण्यावरुन केल्याचे समोर आले. यासाठी आणखी तिघांनी त्याला सहकार्य केले तसेच या खुनासाठी १० लाख रुपयांची सुपारी ठरली होती. त्यापैकी २ लाख रुपये इसार घेतला होता. या प्रकरणात पोलिसांनी श्रीकृष्ण बागलाने, सोमेश्वर वैजिनाथ गव्हाणे, गंगाबाई मंचक पवार या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मंचक पवार याची एक कोटी रुपयांची विमा पॉलिसी होती. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासवून ते एक कोटी रुपये उचलण्याचा गंगाबाईचा डाव होता. मात्र, पोलीस तपासात खून झाल्याचे समोर आल्याने आता हातात बेड्या पडल्या आहेत. यातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
वेब सीरीजमध्ये ‘या’ हॉट अभिनेत्रीचे बोल्ड सीन पाहून प्रेक्षकांना फुटला होता घाम