गुजरातच्या मुंद्रा बंदरावर तब्बल ३७६ कोटींचे हेरॉईन जप्त

Heroin
Photo: Social Media

अहमदाबाद: गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदराजवळ एका कंटेनरमध्ये दडवून ठेवलेले तब्बल ३७६ कोटींचे ७५.३ किलो हेरॉईन दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी जप्त केले. फॅब्रिक रोलमध्ये ते ठेवण्यात आले होते. संयुक्त अरब अमिरातमधून (यूएई) आणलेले हेरॉईन पंजाबमध्ये पाठवण्यात येणार होते, असे पोलिसांनी सांगितले. या तस्करीचा भांडाफोड झाल्यामुळे मुंद्रा बंदर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

गुजरातचे पोलीस महासंचालक आशीष भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदेशातून गुप्त पद्धतीने अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती पंजाब पोलिसांनी दिली. त्यानंतर गुजरात एटीएसचे पथक व पंजाब पोलीस दलातील उपनिरीक्षकांचा चमू बंदरावर पाठवण्यात आला. यूएईच्या अजमन फ्री झोनमधून गेल्या १३ मे रोजी आलेल्या एका नौवहन कंटेनरची झडती घेण्यात आली. यात ५४० फॅब्रिक रोल्स हाती लागले. यापैकी ६४ रोलमध्ये तब्बल ७५.३ किलो हेरॉईनची पावडर आढळून आली आहे. प्लास्टिक पाईपमध्ये हेरॉईन लपवून त्याला कार्बन टेपने सील केले होते. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३७६.५ कोटी एवढी असल्याचे भाटिया यांनी सांगितले. सध्या मुंद्रा बंदरावर अनेक कंटेनर्सची तपासणी सुरू आहे.

त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हाती लागण्याची शक्यता आहे. मुंद्रा बंदरावर आलेल्या अमली पदार्थांची तस्करी, महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल व इतर राज्यांत करण्यात येणार होती, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष बाब अशी की, गुजरात एटीएस, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आणि राज्य व केंद्र सरकारच्या विविध संस्थांनी अलीकडच्या काळात मुंद्रा बंदरावर कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. देशाच्या विविध भागांत पाठवण्यासाठी आलेल्या कंटेनरमध्ये हे मादक पदार्थ होते. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात मुंद्रा विमानतळावर दोन कंटेनरमध्ये सुमारे ३००० किलो हेरॉईन आढळल्याने खळबळ माजली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २१ हजार कोटींहून अधिक होती. गेल्या मे महिन्यात याच बंदरावर ५०० कोटी किमतीचे ५६ किलो कोकेन मिळाले.
अन् बैलांच्या खांद्यावरील ओझे झाले कमी; आर. आय. टी. च्या विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट