बीजिंगः चीनमध्ये कोरोनाच्या नवीन एक्सई व्हेरियंटने पुन्हा थैमान घातलेले असताना आता या ठिकाणी ‘एच३एन८’ बर्ड फ्लूच्या संकटाने डोकेवर काढले आहे. प्रथमच मानवामध्ये बर्ड फ्लूच्या या स्ट्रेनचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. परंतु प्रशासनाने या स्ट्रेनचा संसर्ग मानवामध्ये पसरण्याचा धोका कमी असल्याचे सांगत लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या ‘एच३एन८’ स्ट्रेनची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. या स्ट्रेनचा मानवामध्ये शिरकाव होण्याची ही पहिली घटना असल्याचे सांगितले जात आहे. एका चार वर्षांच्या मुलामध्ये तापासह इतर अनेक लक्षणे आढळून आली आहेत. चाचणीमध्ये त्याला बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे आयोगाने म्हटले.
मात्र, हा संसर्ग पसरण्याचा धोका कमी असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मुलाच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही व्यक्तीमध्ये हा स्ट्रेन आढळला नाही. आपल्या घरातील पाळीव कोंबड्या आणि पक्ष्यांच्या संपर्कात आल्याने मुलाला संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. ‘एच३एन८’ची प्रकरणे आतापर्यंत घोडे, कुत्रे आणि पक्ष्यांमध्ये आढळली आहेत. परंतु मानवामध्ये याचा संसर्ग होण्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हा स्ट्रेन एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरण्याची शक्यता अतिशय कमी आहे.
त्यामुळे महामारीचा धोका कमी आहे. तरीही आमच्या एका चमूचे यासंबंधीच्या स्थितीवर लक्ष असल्याचे चीनच्या आरोग्य विभागाने सांगितले. तसेच लोकांना मृत आणि आजारी पक्ष्यांपासून दूर राहण्याचे आणि ताप किंवा श्वसनासंदर्भात लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बर्ड फ्लूचे ‘एच५ एन१’ आणि ‘एच७एन९’ स्ट्रेन अनुक्रमे १९९७ आणि २०१३ साली सर्वप्रथम आढळले होते.