नवी दिल्ली: हवामान खात्याने देशात यंदा मान्सून त्याच्या नियोजित वेळेपूर्वीच दाखल होणार असल्याची आनंदवार्ता दिली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा अंदमान निकोबारमध्ये १५ मे रोजीच मान्सूनचा पहिला पाऊस पडेल.
त्यानंतर २५ मेपर्यंत केरळात आणि १ जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. गत महिनाभरापासून उष्णतेच्या लाटेत देशातील बहुतांश राज्ये होरपळत असून लवकर मान्सून दाखल झाला तर लोकांना तेवढाच दिलासा मिळेल.
सामान्यपणे दरवर्षी मान्सून २२ मे रोजी अंदमानात दाखल होत असतो. हवामान खात्याने गुरुवारी एक निवेदन जारी करत यंदा नैऋत्य मान्सून १५ मे रोजीच्या आसपास दक्षिण अंदमान आणि बंगालच्या खाडीत दाखल होईल, असा अंदाज आहे. मान्सून साधारण आठ दिवस आधी अंदमानात दाखल होत असल्याने केरळातदेखील तो १ जूनऐवजी २५ मेच्या आसपास दाखल होऊ शकतो.
देशाच्या मुख्य भूमीत दाखल झाल्यानंतर कोणत्याही अडथळ्याविना मान्सूनचा प्रवास सुरू राहिला, तर सामान्यपणे ७ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यंदा मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या तारखेलाच तळकोकणात बरसेल, असा अंदाज आहे. येत्या काही दिवसांत हवामान खात्याकडून मान्सूनचा सुधारित अंदाज जाहीर करण्यात येईल.
यापूर्वी हवामान खात्यासोबतच हवामानाची माहिती देणारी खासगी संस्था ‘स्कायमेट’ ने देखील देशात यंदा सामान्य मान्सून राहील, असा अंदाज वर्तवला होता. देशात सामान्य मान्सूनचा अंदाज असला तरी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा या कृषी क्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचे दिलासादायक भाकीत स्कायमेटने वर्तवले आहे.
डांगरमळे झाले हद्दपार, काकडीला आले अच्छे दिन