बारामती : चारधाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या वाहनाला यमुना महामार्गावर दिल्लीजवळील नोएडानजीक झालेल्या अपघातात पुणे जिल्ह्याच्या बारामतीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. कर्नाटकमधील एका महिलेचाही या अपघातात मृत्यू झाला आहे, परंतु तिचे नाव समजू शकले नाही. गुरुवार, १२ मे रोजी पहाटे हा अपघात झाला.
या अपघातामध्ये बारामतीतील चंद्रकांत नारायण बुराडे (७०, रा. महादेव मळा, बारामती), सुवर्णा चंद्रकांत बुराडे (६५) हे दाम्पत्य, तर रंजना भरत पवार (६०, रा. श्रावण गल्ली, बारामती) व मालन विश्वनाथ कुंभार (६०, रा. वणवे मळा, बारामती) या चौघांचा मृत्यू झाला. हे सर्व ६० वर्षे वयोगटातील आहेत. महाराष्ट्रातून बस व जीपने महिला- -पुरुष चारधाम यात्रेसाठी गेले होते. अपघातग्रस्त गाडीतून सात जण प्रवास करत होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अपघातग्रस्त गाडीचा चालक गंभीर जखमी आहे. गाडीतील आणखी दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
चारधाम यात्रेसाठी एकूण ५० लोक महाराष्ट्रातून निघाले होते. बुधवार, ११ मे रोजी रात्री वृंदावन या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला गुरुवारी पहाटे ४.३० च्या दरम्यान ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. नोएडानजीक जेवर गावाजवळ डम्परला त्यांच्या वाहनाने मागून जोरदार धडक दिली. या गाडीचा चालक नारायण कोळेकर (रा. फलटण, जि. सातारा) गंभीर जखमी झाला असून त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. नोएडामधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त निपाणीमधील मुजावर कुटुंबातील दोन महिलादेखील या अपघातात जखमी झाल्या आहेत. दरम्यान, बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून या प्रवाशांनी अपघातग्रस्तांना मदत केली. अपघात अतिशय भीषण होता, त्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यातील चौघे बारामतीतील आहेत.
– पीक कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १००% व्याज परतावा