नवी दिल्ली: रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) या विद्यार्थ्यांना भारतात आपली ‘इंटर्नशिप’ पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करवून देण्याची घोषणा केली आहे. यासाठी एनएमसीने या विद्यार्थ्यांपुढे परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा उत्तीर्ण करण्याची अट ठेवली आहे.
भारताचे हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतात. पण, रशियाच्या हल्ल्यामुळे या सर्वांना आपले शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात सापडले असताना ‘एनएमसी’ ने या विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप उपलब्ध करवून देण्याची घोषणा केली आहे. ‘परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांना कोविड-१९ व युद्धासारख्या विषम परिस्थितीमुळे आपली इंटर्नशिप पूर्ण करता आली नाही. या विद्यार्थ्यांचा त्रास व त्यांच्यावरील दबाव पाहता त्यांना त्यांची उर्वरित इंटर्नशिप भारतात पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परीक्षा बोर्डातर्फे (एनबीई) घेण्यात येणारी परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा उत्तीर्ण असावे लागेल.
मापदंड पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य वैद्यकीय परिषद १२ महिने किंवा उर्वरित कालावधीसाठी पर्यायी नोंदणी प्रदान करू शकते,’ असे ‘एनएमसी’ ने शनिवारी एका परिपत्रकात म्हटले आहे. वैद्यकीय महाविद्यालये परदेशी वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून इंटर्नशिपसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क वसूल करणार नाहीत. महाविद्यालयांना राज्य वैद्यकीय परिषदेला लिहून द्यावे लागेल,’ असेही ‘एनएमसी’ने स्पष्ट केले आहे.