Homeताज्या बातम्यालवकरच चंद्रावर शेती शक्य! चंद्रावरून आणलेल्या मातीत उगवली रोपे

लवकरच चंद्रावर शेती शक्य! चंद्रावरून आणलेल्या मातीत उगवली रोपे

वॉशिंग्टन : चांद्रमोहिमांमधून पृथ्वीवर आणलेल्या मातीत वनस्पती उगवण्यात प्रथमच शास्त्रज्ञांना यश आले आहे. चंद्रावरील मातीत उगवलेल्या रोपांमुळे पृथ्वीच्या या उपग्रहावर आपली वसाहत वसवण्याच्या मानवी स्वप्नांना नवी पालवी फुटली आहे. कारण चंद्रावर शेती करता आली तर मानवासाठी अन्नासोबतच ऑक्सिजन उपलब्ध होईल.

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने ‘अपोलो’ या नावाने एकूण १४ चांद्रमोहिमा राबवल्या होत्या. त्यापैकी काही यशस्वी, तर काही अपयशी ठरल्या. अंतराळवीरांनी अपोलो ११, १२ आणि १७ या मोहिमांद्वारे चंद्रावरून माती पृथ्वीवर आणली. या मातीत वनस्पती उगवण्याचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी चंद्रावरून आणलेल्या मातीत पांढऱ्या फुलांच्या वनस्पतीची रोपे उगवण्यात यश मिळवले आहे. नासाने या शास्त्रज्ञांना अवघी १२ ग्रॅम माती उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे एवढ्या कमी मातीतून अंकुर फुलवण्याचे मोठे आव्हान शास्त्रज्ञांपुढे होते.

यासाठी शास्त्रज्ञांना भातुकलीच्या खेळात असतात तशी छोट्या आकाराची भांडी वापरावी लागली. काचेच्या छोट्या भांड्यांमध्ये थेल क्रेस नामक वनस्पतीच्या बिया रुजवण्यात आल्या. सोपी-सुटसुटीत जनुकीय संरचना, कमी आयुर्मान आणि सहज उगणारी ही वनस्पती मोहरीच्या कुळातील आहे. या प्रजातीतील वनस्पती मानवासाठी खाण्यालायक आहे. त्यामुळे संशोधनासाठी या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत पेरलेल्या या बियांना पाणी, खते आणि आवश्यक प्रकाश पुरवला. तुलना करण्यासाठी पृथ्वीवरील मातीच्या विविध नमुन्यांमध्येही या बियांची लागवड करण्यात आली.

या सर्व नमुन्यांमधील बिया अंकुरल्या आणि त्यांना पालवी फुटल्याचे शास्त्रज्ञ अॅना पॉल यांनी सांगितले. चंद्रावरील मातीत उगवलेली रोपे इतर मातींमधील रोपांच्या तुलनेत बुटकी होती. काही वाढही उशिराने झाली. त्यामुळे चंद्राच्या मातीशी जुळवून घेण्यात वनस्पतींना अडचणी येत आहेत. मात्र परिस्थितीनुसार प्रत्येकच सजीव स्वतःमध्ये बदल घडवत असतो. त्यामुळे वनस्पती त्यानुसार बदल घडवतील, असा विश्वास पॉल यांनी व्यक्त केला.

अन्न, ऑक्सिजन उपलब्ध होईल
भविष्यात चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे मानवाचे स्वप्न आहे. तसेच पृथ्वीच्या या उपग्रहाचा लांब पल्ल्याच्या अवकाश मोहिमांसाठीचा प्रक्षेपण तळ म्हणून वापर करण्याचे नासासह इतर अंतराळ संशोधन संस्थांचे नियोजन आहे. त्यामुळे चंद्रावरील मातीत वनस्पती उगवण्याला विशेष महत्त्व आहे. या यशस्वी प्रयोगामुळे चंद्रावर शेती करता येईल का? या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर मिळाले आहे. कारण चंद्रावरील शेती शक्य झाली तर भविष्यात तिथे वसवण्यात येणाऱ्या मानवी वसाहतींचा अन्नाचा प्रश्न सुटणार आहे. यासोबतच ऑक्सिजनदेखील उपलब्ध होणार आहे. चंद्रावरील माती खनिजांनी संपन्न आहे. त्यामुळे या मातीपासून रॉकेट साठीचे इंघन मिळवता येईल का, यासाठीदेखील शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत.

चंद्रावरील मातीत वनस्पती उगवण्याचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता. मात्र या प्रयोगाच्या यशामुळे चंद्रावर वनस्पती उगवण्यात काय अडचणी आहेत, हे अधिक स्पष्ट झाले. चंद्रावरील माती ही पृथ्वीवरील मातीपेक्षा फार वेगळी आहे. चंद्रावरील मातीत जीवजंतू, आर्द्रता नसते. मातीत पेरलेले बी अंकुरण्यासाठी पाणी आणि सूर्यप्रकाशासह पोषक तत्त्वे आवश्यक असतात. पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावरील मातीत या पोषक द्रव्यांचा अभाव असल्याने वनस्पतींची लागवड होण्यास आणि लागवड झाली तरी नैसर्गिक वाढ होण्यास अडचण असल्याचे या प्रयोगातून निदर्शनास आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post