मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरायचे काम नाही. ऊस गाळपाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. माझे तुम्हाला सांगणे आहे. माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
मुंबईतील जनता दरबारात बोलताना अजित पवार यांनी हे आवाहन केले. उसाचा गळीत हंगाम वाढला आहे. उसाचे काय होणार, याची चिंता राज्यातील शेतकऱ्यांना लगली आहे. मे महिन्यात रिकव्हरी लॉस जास्त आहे. यावर साखर आयुक्त व सहकार मंत्री आढावा घेत आहेत, असे सांगून ते म्हणाले की, बीड जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली. आमच्या एका शेतकरी बांधवाने आत्महत्या केली. माझ्या शेतकरी बांधवांनो, वेगळे टोकाचे पाऊल उचलू नका.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले की, कार्यालय कुठे खोलावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात देशभरातून लोक येत असतात. यूपीचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात भवन उभारणार आहेत, त्याला आमचा विरोध नाही. आम्हीही यूपीत जाऊन भवन किंवा कार्यालय काढू शकतो.
नाना पटोले यांचे खंजीर खुपसला, हे स्टेटमेंट चुकीचे आहे. ते कुठून आले आहेत, ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भाजपाने बोलावे का, नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेडलाईन बनण्यासाठी ते बोलले असावेत. जबाबदार नेत्याने वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर म्हटले आहे.
– कापूस, सोयाबीन उत्पादन वाढीसाठी सरकारची विशेष योजना