तेलंगणा राज्यात शेतकरीच खरा ‘राजा’

kcr_rao
Photo: Social media

मुंबई : तेलंगणा राज्याने देशातील इतर राज्यांच्या तुलनेत झपाट्याने विकास साधला आहे. औद्योगिक, कृषी, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य आदी सर्वच क्षेत्रांत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भरीव कामगिरी केल्याने देशाच्या नकाशावर आज तेलंगणा राज्याने आपला ठसा उमटवला आहे. कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देत बळीराजाला आत्मनिर्भर करण्यात सरकारने हातभार लावल्याने राज्यात आज खऱ्या अर्थाने शेतकरीच ‘राजा’ ठरला आहे.

तेलंगणा राज्य सरकारने आतापर्यंत सुमारे २२ हजार कोटी रुपयांची ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. कृषी उत्पादनात मागील आठ वर्षांत सुमारे आठ पटीने वाढ होऊन पंजाब राज्याशी स्पर्धा करण्यास राज्य सज्ज झाले आहे. कापूस उत्पादनात तेलंगणा राज्य देशात अव्वल स्थानी आहे. शेतकऱ्यांना खत आणि बियाणे वेळेवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. अन्नधान्याच्या साठवणुकीसाठी गोदामांची संख्या ९.९ लाख टनाहून ३१.९ लाख टन इतकी करण्यात आली आहे.

राज्यातील कोणताही नागरिक उपाशीपोटी झोपू नये, यासाठी दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक व्यक्तीस दरमहा सहा किलो मोफत तांदूळ वाटप केले जाते. मेंढपाळांना राज्य सरकारकडून मोफत शेळ्या देण्यात येत असून आतापर्यंत ७.३ लाख शेळ्यांचे वाटप करण्यात आले असून याकरिता सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. देशात आदर्श ठरलेल्या दलित बंधू योजनेची यशस्वी अंमलबजावणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करत मोठ्या संख्येने गुरुकुल शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता देखील सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत राज्यातील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी सरकारकडून विविध योजना अंमलात आणून यशस्वीरीत्या त्याची अंमलबजावणी केली जात आहे. तेलंगणा राज्याने देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आर्थिक स्थितीत झपाट्याने प्रगती केली आहे. राज्याचा जीएसडीपी ४, ५१, ५८० कोटी रुपयांहून ११,५४,८६० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर २०१५ ते २०२१ सालापर्यंत इतर दक्षिणेतील राज्यांच्या तुलनेत तेलंगणा राज्याने ११.७ टक्क्यांचा आर्थिक विकास दर साधला आहे.

एवढेच नव्हे तर मागील आठ वर्षांच्या कालावधीत राज्यातील दरडोई उत्पन्न १,२४,१०४ रुपयांहून २,७८,८३३ रुपयांवर पोहोचले आहे. जलसिंचनात देखील राज्याने मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली असून औद्योगिक प्रगतीदेखील साधली आहे. परिणामी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासह इतर क्षेत्रांतील बड्या कंपन्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. ऊर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने २४ तास अखंड वीजपुरवठा करण्यात राज्याने आपली कटिबद्धता कायम ठेवली आहे.
शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे वाढता कल; शेतकऱ्यांकडून बियाण्यांसाठी चाचपणी