शेतातील ऊस वाळून चिपाड, शेतकरी कुटुंबासह रस्त्यावर

farmer
फोटो: सोशल मेडिया

अंबाजोगाई (जि. बीड): सात महिन्यांचा कालावधी लोटला तरी साखर कारखाना ऊस गाळपासाठी नेत नसल्याने अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथील शेतकऱ्याने शनिवारपासून आपल्या कुटुंबासह भर उन्हात रस्त्यावर ठाण मांडून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथील शेतकरी रवींद्र विक्रम ढगे यांनी अडीच एकरात दोन वर्षांपूर्वी एक लाख रुपये उसनवारी घेऊन ऊसाची लागवड केली. पहिल्या वर्षी नॅचरल शुगर या साखर कारखान्याने नोव्हेंबर २०२० मध्ये ऊस गाळपासाठी नेला. पुंढील हंगामाची नोंदही साखर कारखान्याने घेतली. त्यानुसार हा ऊस साखर कारखान्याने गाळपासाठी नेणे क्रमप्राप्त होते.

ढगे यांनी कारखाना प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, सात महिन्यांचा कालावधी लोटला, तरीही त्यांचा ऊस अजूनही शेतातच उभा आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा उसाच्या शेतीवरच अवलंबून असल्याने हतबल झालेले ढगे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले आहे.

शेतकऱ्यांची लूट

ऊस तोडून नेण्यासाठी मुकादम अथवा ऊस तोड करणाऱ्या हार्वेस्टर मशीनचा चालक शेतकऱ्यांकडे प्रति एकरी १५ ते २० हजार रुपयांची मागणी करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. याशिवाय ट्रॅक्टर चालकांचा रोजचा भत्ता पाचशे रुपये, कोयत्याची होणारी पूजा यासाठीची वेगळी दक्षिणा असा हा आतला व्यवहार एकरी २५ हजार रुपयांपर्यंत जातो. अशा विविध मागनि शेतकऱ्यांची लूट सुरु असूनही ऊस लवकर जात नाही. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.
नाफेडच्या हरभरा, तूर खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची चांदी! शेतकऱ्यांचे सातबारा व्यापाऱ्यांकडे