शेतकरी आंदोलन २२व्या दिवशी सुरुच; म्हणून मुख्यमंत्री आणि प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात ठोकणार दावा

cotton farmer
फोटो: सोशल मेडिया

भुसावळ: पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथील कापसाच्या खेडा खरेदीत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन २२व्या दिवशीही सुरु आहे. येत्या ९ जूनपर्यंत न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्री व प्रशासनाच्या विरोधात दावा दाखल करावा लागेल] अशा आशयाचे पत्र सामाजिक कार्यकर्ते नीळकंठ पाटील यांनी दिले आहे..

शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीसह पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला दिले असून ६ जून रोजी हे पत्र कृषी मंत्रालयाकडे वर्ग केले असल्याचे उत्तर देखील मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे या गावामध्ये स्थायिक झालेले व्यापारी | राजेंद्र भिमराव पाटील याने ८-१५ दिवसांच्या बोलीवर उधारीने कापूस खरेदी केला आणि तब्बल ६० शेतकऱ्यांची ८४ लाख रुपयांची फसवणूक करत गाव सोडून फरार झाला. शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला फसवणुकीची तक्रार केली. मात्र तक्रार करून चार महिने उलटूनदेखील व्यापारी पोलिसांना सापडलेला नाही. शेतकऱ्यांनी शासन तसेच प्रशासनाकडे मदतीसाठी विविध प्रकारे प्रयत्न केले. मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली असून वाडी व शेवाळे येथील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय असून त्यांना चालू हंगामासाठी शेती तयार करायलादेखील पैसा उपलब्ध नाही. तसेच यापूर्वीची थकबाकी भरण्यास असमर्थ ठरल्याने व्यापारीदेखील नविन बी-बियाणे, खते इत्यादी वस्तू उधारीवर द्यायला तयार नाहीत. म्हणून

शेतकऱ्यांनी कापसाचे पैसे मिळण्यासाठी १७ मे पासून आजपर्यंत वाडी या गावी बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे

या शेतकऱ्यांना शासनाने मदत न केल्यास यावर्षी त्यांची शेती पडीत राहणार असून मुलांच्या शिक्षणाचा व भविष्याचा देखील प्रश्न उभा राहणार आहे, असे पत्रात म्हटले आहे.

शेतकऱ्यांचा शेतमाल हा काही त्यांना पगार, पेन्शन किंवा मानधन स्वरूपात मिळालेला नसतो तर त्यांना तो पिकविण्यासाठी मुलभूत खर्च हा ६० ते ६५ टक्के करावाच लागतो. म्हणूनच शेतमालाची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाल्यापासून ७ दिवसांच्या आत संपूर्ण शेतमालाचे पैसे व त्यावर १८ टक्के व्याज शासनाने द्यावे व त्याची वसूली कलम भा. द. वि. ४२० व १३८ या कलमांप्रमाणे न्यायालयातून परस्पर संबंधीत फसवणूक करणाऱ्या व्यापारी, आडत्या व कारखान्याकडून दंडासह वसुल करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष फसवणूक नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात झाली असून फसवणूक करणाऱ्या व्यापारावर विश्वास ठेवत परस्पर पैसे वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांनी दोन ते तीन महिने प्रयत्न केले. त्यामुळे व्यापायाला पुरेसा वेळ त्यामुळे मिळाला आणि तो पसार झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करत असून कसोशीने आरोपीचा शोध घेतला जात आहे. -महेंद्र वाघमारे ए.पी.आय. पिंपळगाव.

विश्वासाने दिलेल्या कापसाचा एक रुपया देखील मोबदला न मिळाल्यामुळे आणि प्रचंड आर्थिक फसवणूक झाल्यामुळे कुटुंबाचा रहाट गाडगा चालवणे कठीण झाले आहे. -सुरेश शिंपी, शेतकरी.

माझी तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक झाली असून प्रचंड आर्थिक झळ सोसावी लागत आहे. लवकरात लवकर आरोपीचा शोध घेतला जावा शासनाकडून आर्थिक मदत मिळावी ही अपेक्षा आहे. -इंद्रसिंग पाटील, शेतकरी.
शेतकऱ्यांसह खरेदीदारही थांबले; सोयाबीन दीड महिन्यात ८०० रुपयांनी घसरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here