पावसाची रिपरिप; शेतीची कामे खोळंबली; शेतात वाढतेय तणकट, सोयाबीनवर किडींच्या प्रादुर्भावाची भीती

soyabean seeds
Photo: Google

वाशिम : गतं तीन, चार दिवसांपासून वऱ्हाडातील वाशिम, अकोला, बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यांत पावसाची रिपरिप कायम असल्याने शेतातील महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. डवरणी, निंदणाची कामे प्रभावित झाल्याने पिकांमध्ये तणकट वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंताही वाढत आहे. पावसामुळे काही क्षेत्रावरील सोयाबीनची पाने पिवळी पडत असून पिकांवर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला.

अमरावती विभागात ३२ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे. ९ जुलैपर्यंत २६ लाख १३ हजार ९९५ हेक्टरवर पेरणी झाली असून, ही टक्केवारी ८७ टक्के आहे. गत तीन, चार दिवसांपासून वाशिमसह बुलडाणा, अकोला जिल्ह्यातही पावसाची रिपरिप कायम आहे. ढगाळ वातावरण पाहता, पुढील दोन दिवस पावसाचेच राहतील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.

सततचा पाऊस व ढगाळ वातावरणांचा परिणाम शेती पिकांवर होत असून, शेतीची कामेसुद्धा खोळंबली आहेत. पावसामुळे डवरणी, वखरणी, पिके फवारणी तसेच निंदनाची काम प्रभावीत झाली आहेत. सततच्या पावसामुळे कीटकनाशक फवारणी होत नसल्याने याचा फटका पिकांना बसण्याची भीतीही शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे.

वाशिम जिल्ह्यात गत तीन, चार दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे. यामुळे निंदण, डवरणी, फवारणी आदी कामे प्रभावित झाली आहेत. ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव होत आहे. -पांडुरंग सोळंके, शेतकरी नागठाणा, ता. जि. वाशिम.

सततच्या पावसामुळे शेतात जाणेही कठीण झाले आहे. डवरणी, निंदण नसल्याने पिकांमध्ये तणकट वाढत आहे. मात्र, पावसामुळे शेतीची कामे करता येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. – गौतम भगत, शेतकरी चिखली, ता. रिसोड, जि. वाशिम.
जायकवाडी धरणात आवक वाढली; जोरदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग